। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांना पदावरुन काढुन टाकण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. राजेश मोकल यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार केल्याची तक्रार ग्रा.पं. सदस्य विवेक म्हात्रे व विनोदिनी कोळी यांनी केलेल्या तक्रारीवर कोकण विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेत सदर निर्णय दिला आहे.
विवेक म्हात्रे व विनोदिनी कोळी यांनी केलेल्या आरोपानुसार सरपंच राजेश भिकाजी मोकल यांनी आपल्या सरपंच काळात, ग्रामपंचायतीने विलास पवार यांना कचरा ठेकेदार म्हणून लाखो रुपयांची रक्कम बेकायदेशीररित्या अदा करणे, त्यानंतर ग्रामपंचायतीने वसूल केलेल्या 4 लाख 78 हजार 539 रु. ग्रामनिधीमध्ये जमा न करता परस्पर रोखीने खर्च करणे, मासिक सभेत सदस्य हजर नसताना सूचक व अनुमोदक म्हणून नावे दाखविणे, विहीर दुरुस्ती कामामध्ये रोख रकमा देणे, यासह इतर आरोप केले होते. या तक्रार अर्जानुसार पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी चौकशी करुन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला होता. सदर अहवालाच्या अनुषंगाने सरपंच राजेश मोकल यांनी ग्रामपंचायत कामकाजांमध्ये अनियमितता व कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत असल्याचे निदर्शनास येत असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र. 3) कलम 39 (1) नुसार कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणी अधिनियमातील तरतुदीनुसार रितसर चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबत रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 21 जानेवारी रोजी आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 29 जुन रोजीच्या पत्रान्वये आपला अहवाल सादर केला. याप्रकरणी निर्णय घेण्यापुर्वी संबंधीतांचे म्हणणे ऐकुण घेण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर, 10 नोव्हेंबर, 6 डिसेंबर रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी वेळी सरपंच राजेश मोकल हे अनुपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार अनियमितेस सरपंच जबाबदार असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) कलम 39 (1) नुसार कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात आला. तसेच सबंधीत ग्रामसेवक यांच्या विरुद्ध देखील प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येत असल्याने नमुद करण्यात आले.
याप्रकरणावर निर्णय देताना कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी म्हटले आहे की, सरपचं राजेश मोकल यांनी ग्रामपंचायतीची कामे करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 मधील तरतूदीचे अनुपालन न करता मुद्दाम हलगर्जीपणा करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा नियम 38 अन्वये व महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 मधील परिशिष्ट 2 नियम 11 नुसार कर्तव्य पार पाडण्यात कसुरी केला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार राजेश मोकल यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) कलम 39 (1) अन्वये सरपंच पदावरुन काढुन टाकण्याचा निर्णय दिला आहे.
या संदर्भात योगेश पाटील यांनी महत्वपुर्ण भुमिका घेत भ्रष्टाचारासंदर्भात आवाज उठवित अर्जदार विवेक म्हात्रे व विनोदिनी कोळी यांना सहकार्य करीत सरपंचाचे बेकायदेशीर काम निदर्शनास आणुन दिले. अर्जदारातर्फे अॅड. परेश देखमुख व त्यांचे सहकारी अॅड राकेश पाटील यांनी काम पाहिले.