गणेशोत्सवनिमित्ताने 16 डब्यांची गाडी धावणार
| रोहा | प्रतिनिधी |
गणेशोत्सवासाठी कोकणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सद्या आठ डब्यांची धावणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस (22229/22230) आता दुप्पट क्षमतेने म्हणजेच 16 डब्यांची गाडी कोकणात दाखल झाली. ही गाडी रोहा रेल्वे स्टेशनहुन सोमवारी (दि.25) सकाळी आठ वाजता जलदगतीने कोकणाच्या दिशेने रवाना झाली.
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासूनच या गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही गाडी नेहमीच पूर्ण क्षमतेने धावत असल्याने कोकण विकास समितीने वेळोवेळी ही गाडी 16 किंवा 20 डब्यांची चालवावी अशी मागणी केली होती. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या लेखी पाठपुराव्यानंतर अखेर या मागणीला यश मिळाले आहे. रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांच्या मतानुसार, गणेशोत्सवातील गर्दी पाहता 16 डब्यांच्या रेकसह तीन दिवस तर आठ डब्यांचा रेक वापरून तीन दिवस असे सहा दिवस वंदे भारत एक्सप्रेस चालवणे रेल्वेला शक्य आहे.
दरम्यान, गणेशोत्सव आठ ऐवजी सोळा डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय कोकणातील प्रवाशांची मागणी आणि गर्दी लक्षात घेता गणेशोत्सवात महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे आता अनेक प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट बुकिंग करणे सोपे होणार आहे. आठ ऐवजी सोळा डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याने वंदे भारत एक्सप्रेसची वेटिंग वर तिकीट असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गाडीला रायगड जिल्ह्यातील पनवेल नंतर थेट चिपळूण येथे थांबा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवासाठी विशेष सेवा
25 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत ही गाडी आठ ऐवजी 16 डब्यांसह धावणार आहे. यामुळे मुंबई-गोवा प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अधिक जागा उपलब्ध होणार असून गणेशोत्सवातील वाढती गर्दी कमी करण्यास मदत होईल. या सहा दिवसांत वंदे भारत एक्सप्रेसच्या डाऊनच्या तीन आणि अपच्या तीन अशा एकूण सहा फेऱ्या या 16 डब्यांच्या रेकने होणार आहेत.







