दिंडीतून पर्यावरण संरक्षणाचा संदेश; हजारो भाविक भक्तगण सहभागी
| रसायनी | प्रतिनिधी |
नाणीजधाम येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने उपपीठ मुबंई ते नाणीजधाम रत्नागिरी या वसुंधरा पायी दिंडीचे रायगडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वसुंधरा पायी दिंडीचे ठिकठीकाणी ढोल ताशांच्या गजरात तसेच लेझीम पथकांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी तसेच या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत करण्यासाठी माजी नगरसेविका आरती केतन नवघरे, प्राध्यापक सुनिल निकुंभ नाणीजधाम मुख्य पिठातील पदाधिकारी आणि भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वसुंधरा पायी दिंडीच्या निवासस्थानी वृक्षारोपण करण्यात आले.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पर्यावरणाची करु रक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा’ अशा घोषणा करत वसुंधरा पायी दिंडीचे व्यापक स्वरूपात आयोजन करण्यात आलेले आहे. पर्यावरणाचा संदेश देत सुमारे दोन हजार भाविक भक्तगण या दिंडीत सहभागी झाले आहेत. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून ग्लोबल वार्मिंग जनजागृती करत, रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुका घेऊन अध्यात्म आणि सामाजिक जनजागरण करत दररोज 25 किलोमीटर पायी प्रवास करत करत नाणीजधामकडे ही दिंडी मार्गस्थ होणार आहे. या पायी दिंडीत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे हजारो अनुयायी ज्यांना दिंडी यांत्रिकी म्हटले जाते; ते हजारो किलोमीटर पायी प्रवास करून दिनांक 21 ऑक्टोबर रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवासाठी श्री क्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार आहेत.
अनेक सामाजिक सेवाकार्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने केले जातात. त्यामध्ये 175 मरणोत्तर देहदान, 77 अवयवदान, महामार्गावर रुग्णवाहिका सेवा, रक्तदान, ब्लड इन नीड, मुलामुलींसाठी वेद्यपाठशाळा, बोर्ड इंग्रजी माध्यम शाळा, सर्व उपपीठ येथे नियमित दोन वेळेचा मोफत महाप्रसाद, दुर्बलघटकांचे पुनर्वसन, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती या प्रकारे समाजासाठी अनेक मोफत सेवा दिल्या जातात. उपपीठ मुंबई ते नाणीजधाम वसुंधरा पायी दिंडी दिनांक 4 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रायगड जिल्यातील पनवेल, पेण, खालापूर व रोहा या तालुक्यातून प्रवास करत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोस्तवदिनी नाणीजधामकडे मार्गस्थ होणार आहे.
ग्लोबल वार्मिंगविषयी जनजागृती
हि दिंडी ग्लोबल वार्मिंगचे धोके काय आहे? पर्यावरणाचा समतोल कसा राखावा, निसर्गाचे रक्षण करावे, पृथ्वी रक्षण करावे, प्लास्टिक वापर करू नका, झाडे लावा झाडे वाचवा, झाडे तोडू नका, प्रदूषण टाळा, नदी नाले स्वच्छ ठेवा, परिसरात स्वच्छता राखा, असे संदेश देणारे फलक हातात घेऊन चालणारे युवायुवती जनजागृती करत आहेत. त्याचप्रमाणे युवायुवती ग्लोबल वार्मिंग वे पथनाट्य सादर करत जनजागृती करत आहेत.
हजारो झाडांचे वृक्षारोपण
दिंडी महाराष्ट्रातील बहुतांश भागातून हजारो गावातून अनेक तालुक्यांतून, जिल्ह्यांतून जात आहेत. या प्रवासादरम्यान जेथे दिंडी दिवसात चार वेळा नाश्ता व जेवण करण्यासाठी थांबते त्या ठिकाणी प्रतिष्ठीत मान्यवर यांच्या हस्ते हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सूक्ष्म नियोजननुसार या पायी चालणाऱ्या यात्रिकीना पर्यावरण संवर्धनविषयी संदेश देणारे विशेष गणवेश देण्यात आले आहे.





