नाशिकच्या प्रशासकीय पथकाची घोषणा
| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वावेहवेली हे गाव आता स्वप्नातील गाव म्हणून विकसित होणार आहे. स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून ही नवीन संकल्पना राबविली जात आहे.यासाठी नाशिकच्या प्रशासकीय पथकाने नुकतीच या गावाला भेट देऊन तेथील एकूण परिस्थितीची पाहणी केली. स्वप्नातील गाव एक आदर्श गाव अशी घोषणा यावेळी करण्यात आली आहे.
या दौर्यात नाशिक जिल्हा परिषदेचे नोडल ऑफीसर भारत वेंदे यांच्या नेतृत्वाखाली एक प्रशासकीय अधिकार्यांचे पथक नुकतेच या गावात आले होते. प्रवेश करताना स्वप्नातील गाव वावेहवेली या नामफलकाचे फित कापून अनावरण झाले. काही कामांची पाहणी झाली. मान्यवरांचे शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अध्यक्ष स्थानी सरपंच माधुरी पारावे या होत्या.यावेळी गाव समिती सचिव केशव पारावे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला माजी महिला बालकल्याण सभापती गीता जाधव, अॅड. उत्तम जाधव, मंडळ कृषी अधिकारी सागर वाडकर, ग्रामसेवक उमाजी माडेकर, तलाठी किशोर मालुसरे, आरोग्य अधिकारी,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा समिती अध्यक्ष एकनाथ पारावे, सागर पारावे यांनी गाव विकासाच्या विकासासाठी स्वदेसने केलेल्या कामाबाबत माहिती दिली. या स्वप्नातील गाव या संकल्पनाासाठी तळा मॅनेजर रविंद्र राऊत, स्वदेस प्रतिनिधी शैलेंद्र सूर्यवंशी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन राम सावंत यांनी केले.