रायगडातील महामार्ग बनत आहेत मंडई

ताज्या भाज्यांबरोबर फळांची विक्री वाढली

| रायगड | सुयोग आंग्रे |

रायगड जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा अशी ओळख असली तरी रायगड जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात चांगली कामे कारण्यास सुरुवात केली आहे. मुंबई आणि पुणे या आर्थिक उलाढाल करणार्‍या प्रमुख जिल्ह्यांना लगतचा असणारा जिल्हा रायगड आहे. आर्थिक केंद्रबिंदू बनू पाहणार्‍या रायगड जिल्ह्यात जनतेला अपेक्षित असणारे मॉल उभे राहिले नसले तरी भाज्या आणि फळे खरेदी-विक्रीसाठी सहज जागा उपलब्ध झाली आहे. रायगड जिल्ह्यातील भाजीपाल्याला जिल्ह्यातून जाणारे महामार्ग बाजारपेठ बनले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्ग फू्रट व्हेजिटेबल मॉल बनत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

रायगड जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने देश-विदेशातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे आणि गडकिल्ल्यांना भेटी देतात. येणारे पर्यटक आपापली चारचाकी आणि दुचाकी वाहने घेऊन रायगड जिल्ह्यात दाखल होतात. त्याचबरोबर तळकोकणात जाणारे चाकरमानी आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूर बाजूला जाणारे प्रवासीदेखील जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गाचा वापर करतात. येणारे पर्यटक किंवा प्रवासी रायगड जिल्ह्यातून पालेभाज्या आणि फळे घेऊन जाणे पसंत करीत असल्याचे आजचे चित्र आहे. मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई पुणे महामार्गावर लगतच्या जागेत वाहने पार्क करून भाजी आणि फळे खरेदी साठी झुंबड उडत आहे. पेण, माणगाव, पोलादपूर, पनवेल, खालापूर या तालुक्यांमध्ये पालेभाज्यांच्या पिकाला स्थानिक बाजारपेठेव्यतिरिक्त अधिकचे दाम मिळवून देणारी बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. यावर प्रथम पेण, पोलादपूर आणि माणगाव येथील शेतकर्‍यांनी मुंबई-गोवा महामार्गालगत आपले मुंबई-गोवा महामार्गावर टोपल्यांमधून भाजी विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पनवेल, खालापूर तालुक्यात स्थानिकांनी आपली भाजी आपणच विक्री करण्यास सुरुवात केली आहे. आता या स्थानिकांच्या पालेभाजी विक्रीला अधिक चांगली बाजारपेठ मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्ग बनली आहे.

रायगड जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूर, जिते, वडखळ, माणगाव शहरातील बाजारपेठ, पोलादपूर शहरातील बाजारपेठे त्याचबरोबर खालापूर तालुक्यातील खालापूर नाका, चौक, रसायनी फाटा येथे पालेभाजी विक्रीचे झाडांच्या पानाचे स्टॉल उभाण्यात आले आहेत. स्थानिक शेतकर्‍यांनी पिकविलेल्या ताज्या भाज्या खरेदी करण्यासाठी या स्टॉलसमोर बीएमडब्ल्यू , मर्सिडीजसारख्या गाड्यादेखील थांबत आहेत. स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतातून थेट आलेली भाजी असल्याने आणि भाजीचे दर कमी असल्याने खरेदी करण्यासाठी झुंबड उडत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्गावर पालेभाज्यांबरोबरच फळांच्या खरेदीलादेखील पर्यटकांची आणि स्थानिकांची अधिक पसंती आहे. स्थानिक शेतकरी ही फळे येथे लागवड करून पीक घेत नसलेतरी येथे विक्रीसाठी लावण्यात आलेल्या फळांचा ताजेपणा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. एखाद्या शहरात फळे मिळणार नाहीत अशा सर्व प्रकारची फळे या स्टॉलवर उपलब्ध होत असल्याने हायवे फ्रुट व्हेजिटेबल मॉल पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे.

महामार्ग रोजंदारीसाठी उपयुक्त ठरला आहे. गावापासून दूर असलातरी महामार्गाच्या बाजूला भाजी आणि फळे विकण्याची संधी मिळत असल्याने रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रतिदिनी दिवसाचा रोजगार आणि नफा कमावता येतो. भाजी स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतातून येत असल्याने वाहतुकीचा खर्च वाचतो. यामुळे आम्हाला भाजी विक्री करणे परवडते. दैनंदिन विक्रीतून आरोग्याचा खर्च वगळून घर खर्च निघतो.

रसिका पाटील, हमरापूर


भाजी स्थानिक शेतकर्‍यांकडून मिळते. परंतु, ताजी फळे आणण्यासाठी पनवेल, नवी मुंबई येथे जावे लागते. महामार्गवरील वाहनांची वर्दळ आणि भाजी, फळे खरेदी करणार्‍यांची संख्या वाढत आहे. दिवसभरात भाजी आणि फळांची चांगली विक्री होते. ताजी भाजी आणि फळे मिळत असल्याने ग्राहक खरेदीसाठी आवर्जून थांबतात. रोज होणारी विक्री सुखावणारी असतेच असे नाही; परंतु, महामार्गामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.

नवीन पाटील, हमरापूर
Exit mobile version