। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
आगामी श्रावण महिना म्हणजे उपवासाचा महिना. आधीच महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकले आहेत. कडधान्य, डाळींचे दर वाढलेले आहेत. त्यातच भाज्यांचे दर भाव खात आहेत. यामुळे आखाडात महागलेला भाजीपाला आता श्रावणातही कडाडण्याची भीती महिला वर्गातून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड बसत आहे.
श्रावण महिना सुरू होत असून सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. या काळात भाज्या, फळांचा खप जास्त होत असतो. सात्विक आहारामुळे तेल, तूप, डाळी, कडधान्यांचाही खप होतो. परंतु, दरवाढीचा फटका ग्राहकांना बसत आहे. शासन एकीकडे विविध योजना जाहीर करून सर्वसामान्यांना पैशाची भुरळ घालत आहे. त्यामुळे लाडकी बहिणीसारखी योजना राबवून एका हाताने दिल्यासारखे करायचे तर दुसर्या हाताने काढून घ्यायचे, ही क्लृप्ती शासनाने वापरली आहे की काय? असा सवाल आता महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून कांदा, बटाटा, लसूण दरात वाढ झाली आहे. कांदा 50 ते 55 रुपये तर बटाटा 45 रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. 100 रुपयांना दोन किलो कांदे, तर बटाटे अडीच किलोप्रमाणे विकण्यात येत आहे. लसूण दरात किलोमागे शंभर रुपयांची वाढ झाली असून, 400 रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.







