रेल्वे स्टेशन परिसराला वाहनांचा गराडा

ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्गाला नाहक त्रास
। पनवेल। वार्ताहर ।
पनवेल रेल्वे स्टेशन परिसर तसेच खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यात येत असल्याने येथून ये-जा करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथील प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशन परिसर व स्टेशन बिल्डिंगमध्ये दुकाने व कँटिन शॉप बांधण्यात आले आहेत, जेणे करुन प्रवाशांची सोय होईल. पण आजपर्यंत सिडकोने दुकाने, कँटिन कोणालाही भाड्याने दिले नाही व स्वतःही चालू केली नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच सिडको प्रशासनाचे आत्तापर्यंत करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरीही प्रशासनाला जाग येत नाही. त्याचप्रमाणे खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन परिसरातील समोरील ओपन असलेली जागा पंतप्रधान आवास योजनेला दिली असून, येणार्‍या प्रवाशांच्या गाड्यांना पार्किंग राहिली नसल्याने पार्किंग स्टेशन आवारात व रस्त्यावरती जागा मिळेल तिथे गाड्या पार्किंग करतात. त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍या वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले यांना फार त्रास होत आहे. सिडकोने स्टेशन आवाराच्या बाहेर दोन वाहनतळ तयार केले आहे, पण तेथे कुठलाही ठेकेदार न दिल्यामुळे ते पडून आहे. त्याचे आर्थिक नुकसान सिडको भोगत आहे. यावर लवकरात लवकर सिडकोने काहीतरी निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहे.

Exit mobile version