| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरात दिवसेंदिवस वाढती पर्यटक संख्या या अनुषंगाने अद्यापही येथे नगरपरिषदेचे वाहनतळ नसल्याने पर्यटकही जागा मिळेल त्या ठिकाणी आपले वाहन उभे करीत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी समस्या निर्माण होऊ लागली आहे.
पर्यटन क्षेत्रात ‘ब’ दर्जा प्राप्त श्रीवर्धनला महाराष्ट्रातील पर्यटक हजेरी लावतात. वाढती पर्यटक संख्या या दृष्टीने अनेकांनी रिसॉर्ट, होम स्टे, लॉज, खाणावळ असे पर्यटन पूरक व्यवसाय सुरू करीत उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त केले आहे. आजच्या घडीला प्रत्येक पाखाडी, आळी मधून होम स्टे, लॉज बघावयास मिळतात. परंतु, अनेकांनी पर्यटन पूरक व्यवसाय सुरू करतांना एखाद दोन मुक्कामासाठी आलेल्या ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठी जागेची व्यवस्था न केल्याने पर्यटक ही रस्त्याच्या कडेला वाहन उभे करीत निघून जातात.
गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडी ही श्रीवर्धनसाठी मोठी समस्या झाली आहे. नगरपरिषदे मार्फत येणाऱ्या पर्यटकांकडून पर्यावरण नियंत्रण कर व स्वच्छता उपविधी कर आकारला जातोय. परंतु, नगरपरिषदेकडून अद्यापपर्यंत वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. श्रीवर्धन येथील अरूंद रस्ते त्यातच मिळेल त्या मोकळ्या जागेवर आपले वाहन उभे करण्याची पर्यटकांची वृत्ती या कारणास्तव वाहतूक कोंडी समस्या बिकट व्हायला लागली आहे. काही महिन्यात श्रीवर्धन येथे श्रीमंत पेशवे यांचे भव्य स्मारक व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी तसेच प्लॅनेटेरियम साकारले जात आहे. या अनुषंगाने देश विदेशातील पर्यटक संख्या ही वाढणार आहे. भविष्यात श्रीवर्धन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. जेणेकरून, वाहतूक कोंडी समस्येतून रस्ते मोकळे होतील.
श्रीवर्धन हे ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर आहे, भविष्यात पर्यटन, शिक्षण आणि विज्ञानाच एक केंद्र बनणार आहे. या सर्व दृष्टिकोनातून श्रीवर्धन येथे वाहनतळ आवश्यक आहे. त्यासाठी मी प्रयत्नशिल आहे.
खा. सुनील तटकरे.
