| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील तासगावकर शिक्षण समूहाच्या वसतिगृहात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. मित्रांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आल असून त्याला गळफास घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या तीन सहकारी मित्रांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगावकर शिक्षण समूहातील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी तेथील वसतिगृहातच राहून शिक्षण घेतात. वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी तीन ऑक्टोबरपासून वसतिगृहात राहायला आले होते. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी भिवंडी येथील विद्यार्थी हर्षल महाले या विद्यार्थ्याने एक डिसेंबर रोजी वसतिगृहातील खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली होती. सदर विद्यार्थ्याचा मृतदेह दोरीपासून वेगळा केल्यानंतर पोलिसांनी त्या खोलीला बंद करून तपासाची सूत्रे हलवली होती. त्याच दिवशी रात्री त्या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबाकडे दिला होता.
कर्जत पोलिसांच्या पथकाने पुढील दोन दिवस चांदई येथील महाविद्यालयाच्या वसतिगृहात येवून चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान पोलिसांना हर्षलच्या आत्महत्येचे कारण समजले . हर्षलचा त्याच्या खोलीतील सहकारी आणि शेजारच्या खोलीत राहणाऱ्या आणखी दोन विद्यार्थ्यांनी मानसिक छळ केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी मंगळवारी पाच डिसेंबर रोजी तसा गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या करणारा हर्षल वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्यवस्थापनामार्फत प्रवेश घेवून आला होता. त्याच्या खोलीतील सहकारी आणि शेजारच्या खोलीतील दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येऊन प्रवेश मिळवला होता. त्यामुळे ते तिघे हर्षलला सतत तू पैसे भरून आलाय,आम्ही गुणवत्ता प्राप्त करून आलोय असे बोलून मानसिक छळ करीत होते.
या मानसिक छळवणुकीबाबत हर्षलने आपल्या घरी एकदाही सांगितले नव्हते. अखेर हे असह्य झाल्याने कपडे सुकत ठेवण्यासाठी आणलेल्या दोरीच्या सहाय्याने त्याने एक डिसेंबर रोजी आत्महत्या केली.ज्या दिवशी आत्महत्या केली, त्यावेळी हर्षल महाविद्यालयात न जाता वसतिगृहात थांबला होता. आपल्याला होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल त्याने गळफास घेण्यापूर्वी खोलीमधील भिंत आणि कपाटावर अनेक ठिकाणी लिहून ठेवले होते. मोबाईलमध्येदेखील या सर्व गोष्टी साठवून ठेवल्या होत्या. या सर्व बाबींचा सखोल तपस करून कर्जत पोलिसांनी हर्षलच्या सहकारी मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.







