भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

स्पेनवर 2-0 असा विजय; अमित-हार्दिकनं नोंदविला गोल

| रुरकेला । वृत्तसंस्था ।

भारतीय हॉकी संघानं ओडिशाच्या रुरकेलामधील बिरसा मुंडा स्टेडियमवर एफआयएच विश्‍वकप स्पर्धेची सुरुवात धमाकेदार केली आहे. भारताचा पहिला सामना स्पेनविरोधात होता. स्पेनचा भारतानं 2-0 असा पराभव करुन आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. भारतीय हॉकी संघाला गेल्या 48 वर्षांपासून विश्‍वकप जिंकता आलेला नाही. भारतीय संघाचा ‘ड’ गट सर्वोच्च स्थानावर राहून उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न आहे. भारतीय हॉकी संघाचा प्रमुख खेळाडू अमित रोहिदासनं 12 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये केले.

जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम समजल्या जाणार्‍या बिरसा मुंडा स्टेडियमवरील हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. भारताकडून दुसरा गोल 26 व्या मिनिटाला हार्दिक सिंह याने केला. संपूर्ण सामन्यात भारताचं वर्चस्व राहिले. मात्र, भारताला चार पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. कॅप्टन हरमनप्रीत सिंहला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. तर, गोलकीपर कृशन बहादूर पाठकने चांगल्या प्रकारे बचाव केला. स्पेनला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, पण त्यांना त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक खेळी केली. त्यामुळे तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले त्यापैकी दुसर्‍या कॉर्नरवर अमित रोहितासने गोल केला.

Exit mobile version