| मुंबई | प्रतिनिधी |
उपनगराच्या संदेश महाविद्यालयाने कनिष्ठ आणि ज्येष्ठ या दोन्ही गटात विजय मिळवित महर्षी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या महाविद्यालयीन राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. परेल येथील महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या कनिष्ठ गटात संदेशने महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयावर 50-22 अशी मात केली. सुजल मांढरे, अमित करांडे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. महाराष्ट्राचा प्रथम धनावडे बरा खेळला. ज्येष्ठ गटात संदेश महाविद्यालयाने चुरशीच्या लढतीत चेतना महाविद्यालया 23-21 असे चकवित विजयी सलामी दिली. हर्ष प्रभू, कृष्णा सिंग यांच्या संयमी खेळाच्या जोरावर संदेशने पूर्वार्धात 13-11 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र चेतनाच्या प्रथमेश कडवे, राज अधिकारी यांनी त्यांना कडवी लढत देत सामन्यात उत्कंठा निर्माण केली. पण पूर्वार्धातील आघाडीच्या बळावर संदेशने विजय साकारला.
कनिष्ठ गटात भवन्स महाविद्यालयाने लाला लजपत रायला 43-38 असे नमवित पहिला विजय नोंदविला. पहिल्या डावात 26-23 अशी आघाडी घेत त्यांनी विजयाची पाया भरणी केली. दुसऱ्या डावात देखील संयमाने खेळ करीत पहिला विजय साकारला. विशाल पटेल, वैभव तुळसकर भवन्स महाविद्यालयाकडून, तर राजकमल यादव, विशाल लाला लजपतरायकडून उत्कृष्ट खेळले. सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेला. ज्येष्ठ गटात रिझवी महाविद्यालयाने कीर्ती महाविद्यालयाला 53-20 असे सहज नमविले. दिपेश चव्हाण, करण सावर्डेकर यांच्या चतुरस्त्र खेळामुळे रिझवीने 29-10 अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. उत्तरार्धात त्याच त्वेषाने खेळ करीत 33 गुणांच्या फरकाने विजय मिळविला. कीर्तीचा उत्कर्ष ढाकणे बरा खेळला.