जिल्ह्यात गावठी दारूचा धंदा तेजीत

गारंबी, केळघर उत्पादनाचे मुख्य ठिकाण

| मुरुड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याला हात भट्ट्यांची गावठी दारू पुरविणाऱ्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. मुरुड व रोहा तालुक्यातील गारंबी, गोपाळ वाट परिसरातील सर्वच गावांमध्ये गावठी दारूचे होलसेल व्यापारी आहेत. या ठिकाणाहून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारूचे वितरण बिनदिक्कत पणे सुरु आहे. यांना वरदहस्त कुणाचा, असा सवाल सर्वसामान्य जनतेने केला आहे.

गावठी दारूमुळे तरुण मुले व महिला व्यसनाधिन होऊन गावातील लोकांना खूप त्रास देत आहेत. तसेच, या गावठी दारूमुळे अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत. तर, अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. रोहा तालुक्यातील मसाडी, बेलवाडी, फणसाडी, झापडी व पांगलोली येथील हातभट्टीची दारु रोह्यासह मुरुड, अलिबाग, म्हसळा, पेण इत्यादी ठिकाणी वितरीत करण्यात येत आहे. तसेच, मुरूड तालुक्यातील टिटवी, पारगाण, वाघिरपट्टी येथेही गावठी दारू हातभट्टी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. या संदर्भात सर्व सामन्य जनतेकडून पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे. दरम्यान, फणसवाडी (धनगरवाडी) येथील गावठी दारू हातभट्टी पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आली. त्याचे जनतेतून कौतुक होत असताना इतर गावांतील मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांचे जाणूनबुजुन दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या सर्व गावांचे खूप नुकसान होत आहे.

या परिसरातील एकाच गावावर कारवाई का? इतर गावांवर पोलीस मेहेरबान आहेत का? या गावांमध्ये कारवाई कधी होईल, असे प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारले जात आहेत. तरी, या तक्रारीची दखल घेऊन आपण या गोष्टीकडे पूर्णतः लक्ष देऊन याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी, अशी नम्र विनंती सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. तरी, मुरुड पोलिसांनी लवकरात लवकर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील केली जात आहे.

Exit mobile version