शेतकर्यांना सनदीचे वाटप
। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सर्व्हे अन्वये सनद वाटप कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्वामित्व योजनेंतर्गत खालापूर तालुक्यातील कामकाज सुरु असून या तालुक्यातील एकूण 153 गावे व वाड्यांपैकी गावठाण भूमापन न झालेल्या 103 गावांची अत्याधुनिक ड्रोनद्वारे भारतीय सर्वेक्षण विभागामार्फत अत्यंत अचूक पद्धतीने मोजणी करण्यात आली.
भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मोजणी नकाशे मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जागेवर जावून भूमी अभिलेख विभागाच्या अधिकार्यांनी चौकशी करून संपूर्ण अभिलेख डिजिटलाईज करून घेतले.सर्व्हे ऑफ इंडिया मार्फत भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे गावठाणातील प्रत्येक मिळकतीची सनद मिळकत पत्रिका व नकाशा तयार केले जातात. अशा पद्धतीने खालापूर येथे 103 गावांचे ड्रोन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून 45 गावांचे प्रत्यक्ष जागेवर जावून चौकशीचे काम देखील पूर्ण झाले आहे. त्यापैकी 38 गावांच्या मिळकत पत्रिका तयार असून 13 गावांच्या सनद तयार झालेल्या आहेत. सनद हा शासनाने मालकी हक्काचा पुरावा म्हणून घोषित केला आहे.
या कार्यक्रमासाठी विशेष शिबिर घेण्यात आले असून विणेगाव, इसांबे, तोंडली, ढेकू, वारद, कुंभिवली, सारसन, लोहोप, स्वाली, पौद, केळवली या गावांच्या सनद वितरण करण्याचा कार्यक्रम संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आला.
यावेळी संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी उत्तम सहकार्य केले. याप्रसंगी सरासरी 82% वसूली झाली. संबंधित मिळकतधारकांकडून सनद घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. उपअधीक्षक, भूमी अभिलेख, खालापूर या कार्यालयाने शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत संबंधित खातेदारांना सनद वाटप व मिळकत पत्रिका चावडी वाचन केले. या सनदेमध्ये काही अडचणी किंवा चुका असतील तर त्यांचे अर्ज तात्काळ प्राप्त करून घेतले. प्रत्येकाला मालकी हक्काचा पुरावा व अभिलेख मिळाल्यामुळे जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
कोकण प्रदेश, मुंबई भूमी अभिलेखचे उपसंचालक जयंत निकम आणि रायगड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली खालापूर भूमी अभिलेख उपअधीक्षक शरद काळे व त्यांच्या सहकार्यांनी अचूक नियोजन करून ही मोहीम यशस्वी केली.