। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत घुम-रुद्रवट आणि रुद्रवट ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नदीवर वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी श्रमदानातून मेहनत करून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उद्देश ठेवून नदीतील पाणी साठा वाढण्यासाठी याचे नियोजन केले आहे.
म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी रुद्रवट गावच्या नदीच्या ठिकाणी जाऊन बंधार्याच्या ठिकाणी भेट दिली. तसेच ग्रामस्थांनी एकजूटीने श्रमदान करून बंधारे बांधल्याने कौतुक केले. पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम प्रत्यक्षात पूर्ण करून माणसांबरोबरच येथील जंगल परिसरातील प्राणी, पशु, पक्षी यांच्यादेखील पिण्याचे पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होईल, असे सांगितले. तसेच पाणी टंचाईच्या काळातही सक्षम जलस्त्रोत निर्मिती व्हावी हे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन रुद्रवट या गावामध्ये नागरिकांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे याबद्दल कौतुक करून पावसाळी हंगाम संपल्यानंतर ज्या नाले व ओढ्यामधून पाण्याचा प्रवाह चालू असतो, अशा नाला-ओढ्यातील पाण्याचा प्रवाह पारंपारिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा केला जातो. या अडवलेल्या पाण्याचा बिगर पावसाळी हंगामामधे वापर करून पाणी टंचाईवर काही अंशी प्रमाणात मात करता येते. या व्यतिरिक्त गावातील मुक्या जनावरांना देखील प्रखर पाणीटंचाईच्या काळात या बंधार्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याची माहिती गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी दिली.
यावेळी म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव, सरपंच साक्षी घोले, उपसरपंच श्रीकांत बिरवाडकर, ग्रा.पं. सदस्या प्राची शिगवण, ग्रा.पं. सदस्या वर्षा रटाटे, ग्रामसेवक योगेश पाटील, गाव अध्यक्ष केतन आग्रे, सतिश घोले, ग्रामरोजगार सेवक श्रुती गायकर यांसह ग्रामस्थ पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.