मेढेतील ग्रामस्थ नवीन स्मशान शेडच्या प्रतीक्षेत

। तळा । वार्ताहर ।
तालुक्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजला होता. त्याचा फटका अनेक गावांना बसला. त्यामध्ये अनेक घरे, अंगणवाड्या, शाळा शासकीय कार्यालय यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. त्यामध्ये अनेक ठिकाणच्या स्मशानशेडचा समावेश आहे. यामध्ये मेढे आदिवासी वाडीतील स्मशान शेडची दूरवस्था झाली आहे.

काही ठिकाणी प्रशासनाच्या सतर्कतेने दवाखाने शाळा व स्मशान शेड नव्याने उभारण्यात आल्या. परंतु तळा तालुक्यातील तळा तहसील पासून हाकेच्या अंतरावर असलेली मेढे आदिवासीवाडी स्मशान शेड अद्याप दुर्लक्षित असून निसर्ग चक्री वादळामध्ये मोडून पडलेल्या या स्मशान शेडला दोन वर्षे पूर्ण होत आली असतानाही स्मशान शेडची अद्याप दूरवस्था आहे.

या स्मशानशेडचे नव्याने काम न झाल्यामुळे येथील आदिवासी बांधवांना अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मयत व्यक्तीला अंत्यसंस्कार करिता नेण्यात येणार्‍या मार्गावरच शेड मोडून खाली आल्याने ग्रामस्थांना अंत्यविधी करताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच ग्रामस्थांना बसण्याकरिता व उभे राहण्याकरता बनवण्यात आलेल्या शेडची दुरवस्था झाल्यामुळे लोकांना उन्हापासून संरक्षण मिळण्याकरिता झाड व झुडपांचा आधार घ्यावा लागत आहे. याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक यांनी लक्ष घालून मेढे आदिवासीवाडी ग्रामस्थांची समस्या दरू करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version