15 वित्त आयोगातून निधी खर्च करण्याचे निर्देश
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी पावले उचलली आहेत. 15 वित्त आयोगातील बंधीत निधी स्वच्छतेच्या कामांसाठी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गावे, वाड्या आता स्वच्छ होणार आहेत.
रायगड जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून, अनेक गावे स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श होत आहेत. जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 830 गावांपैकी 1 हजार 546 गावे ओ.डी.एफ प्लस मॉडेल झाली आहेत. ग्रामपंचायतींनी गाव कृती आराखडा तयार करताना स्वच्छ भारत मिशन व 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून सार्वजनिक कंपोष्ट पिट, प्लास्टिक संकलन शेड, सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्थिरीकरण तळे, सार्वजनिक शोषखड्डे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, कचरा विलगीकरण केंद्र, घरगुती व सार्वजनिक स्तरीय कचराकुंड्या घेणे, कचरा वर्गीकरण व परिसर सफाईसाठी उपयुक्त अवजारे व कर्मचारी यांच्यासाठी संरक्षण साहित्य घेणे, खत टाकी, नाडेप, गांडूळखत प्रकल्प उभारणी, गोबरधन आणि प्लास्टिक कचरा प्रक्रिया देखभाल व दुरुस्ती, कंपेोस्टींगसाठी आवश्यक साहित्य घेणे, प्लास्टिक कचरा वाहतुकीसाठी वाहनाची व्यवस्था करणे, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचे रेट्रोफिटिंग, कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करणे यासाठीचे मानधन व वेतन, तीन चाकी सायकल, बॅटरी आधारित सायकल घेणे या कामांना प्राधान्य देण्यात यावा, अशी सूचना बास्टेवाड यांनी केली आहे. यामुळे ही गावे स्वच्छ, सुंदर व आरोग्यसंपन्न होतील व स्वच्छतेत सातत्य राहण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांच्या वेशीजवळ रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचा ढीगारा आहे. या ढिगाऱ्यामुळे गावात नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. गावांच्या प्रवेशद्वारासमोरच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कचऱ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी बास्टेवाड यांनी पुढाकार घेत गावे, स्वच्छ ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. या सुचनांची अंमलबजावणी करण्यास ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यशस्वी ठरतील का याकडे लक्ष लागून राहिले आहे.
अन्यथा होणार कारवाई
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, पाणी पुरवठा योजना, पथ दिवे हे सौरउर्जा प्रकल्पावरअसतील असे नियोजन करण्यात यावेत. ही कामे आराखड्यात न घेतल्यास संबाधीतावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करणात येईल, अशी सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.