किंग कोहलीची जर्सी स्टेडियममध्ये झळकली
। लाहोर । वृत्तसंस्था ।
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या खराब कामगिरीमुळे चर्चेचा विषय आहे. सध्या पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स वनडे कप खेळवला जात आहे. 12 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पाकिस्तानच्या या देशांतर्गत स्पर्धेत माजी कर्णधार बाबर आझमसह अनेक वरिष्ठ खेळाडू खेळत आहेत. फैसलाबादच्या इक्बाल स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची क्रेझ पाहायला मिळाली. एक चाहता किंग कोहलीची जर्सी घेऊन स्टेडियममध्ये पोहोचला.
या चाहत्याचा फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये या जर्सीच्या मागच्या बाजूला विराटचे नाव आणि जर्सी नंबर लिहिलेला दिसत आहे. स्टॅलियन्स आणि मार्कोस यांच्यातील स्पर्धेच्या चौथ्या सामन्यादरम्यान, चाहता कोहलीची जर्सी दाखवत होता आणि तितक्यात कॅमेरामनने ती जर्सी आपल्या कॅमेर्यात कैद केली. या सामन्यात मारखोर्स संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान होता तर स्टॅलियन्स संघात बाबर आझम,शान मसूद असे खेळाडू होते. मार्कोर्सने हा सामना 126 धावांनी जिंकला. पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे खूप चाहते आहेत. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध अद्याप एकही कसोटी सामना खेळला नसला तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. या उजव्या हाताच्या फलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 52.15 च्या सरासरीने 678 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक धावसंख्या 183 आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. कोहलीला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी पाकिस्तानी चाहतेही उत्सुक आहेत.