| सुधागड-पाली | वार्ताहर |
विधानसभा निवडणुकीचे साहित्य पोहचविण्यासाठी तसेच निवडणूक कर्मचारी यांची ने आण करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीला मतदानासाठी जातांना व इतर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
बस स्थानकात तसेच नाक्यावर प्रवासी व मतदार एसटी बसची वाट पाहत ताटकळत उभे होते. अनेकजण खाजगी वाहनांना हात करत होते. निवडणुकीच्या कामासाठी लागल्याने एसटी बसेस कमी असल्याचे काही प्रवाशांना माहित होते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत असंतोष व्यक्त केला. काही मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी रिक्षा, मिनिडोअर व खाजगी वाहनांची सोय होती. मात्र दुसर्या गावाला मतदानासाठी जाणार्या मतदारांना वाहनांची सोय किंवा एसटी बस नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली.
सकाळी लवकर खाजगी वाहनाने पालीवरून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भावाशेत या गावी आले. मतदानाचा हक्क बजावल्यावर पुन्हा पालीकडे जाण्यास निघाली असता कोणतेच वाहन उपलब्ध नव्हते, खूप वेळ ताटकळत रहावे लागले. अखेर खाजगी वाहनाने लिफ्ट घेऊन परतले. शासनाने मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करणे किंवा एसटी बससेवा सुरळीत ठेवणे आवश्यक होते.
सरिता निगुडसे,
मतदार, पाली