राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांसह आ. जयंत पाटील यांची पाहणी
। पेण । संतोष पाटील ।
अलिबागच्या पर्यटन विकासामध्ये भर घालणार्या वडखळ ते अलिबाग रस्त्याची आ. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी मंगळवारी (दि.18) पाहणी केली. वडखळ ते अलिबाग हा दुपदरी रस्ता झाल्यानंतर 25 किलोमीटरचे अंतर फक्त 14 मिनिटात पार केले जाणार आहे. या रस्त्याचा अंतिम डीपीआर तयार करण्यास सुरूवात झाली असून, तो तयार होताच या रस्त्याची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी अधिकार्यांसोबत झालेल्या चर्चेअंती दिली. महत्त्वाची बाब म्हणजे, जुन्या रस्त्यालाच दोन्ही बाजूला रुंदी वाढवून हा रस्ता तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष्मीकांत जाधव व पराग गोसावी तसेच शहाबाज, पांडवादेवी, पोयनाड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंदर जोड प्रकल्पांतर्गत आ. जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून वडखळ ते अलिबाग या चौपदरीकरण रस्त्याला मंजुरी मिळवली होती. मात्र, भूसंपादन प्रक्रियेमुळे अनेक अडथळे आल्याने चौपदरीकरणाचे काम ठप्प झाले होते. अखेर त्यावर उपाययोजना करून चौपदरीकरणाच्या कामाऐवजी दुपदरी रस्त्याचे काम करण्याचे ठरले असून, त्याचीच पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी 9.30 वाजता आ. जयंत पाटील यांनी अधिकार्यांसह धरमतर येथील रस्त्याची व पुलाची पाहणी केली. तसेच शहाबाज, पांडवादेवी, पोयनाड या ठिकाणातील स्थानिक शेतकर्यांची मतेही जाणून घेतली.
पुलाचे चौपदरीकरण
धरमतर येथून रेल्वे मार्ग आणि जुना पूल यांच्यामध्ये असणार्या जागेतून पुलाचे काम होणार आहे. भविष्याचा विचार करून जरी रस्ता दुपदरी असला तरी पुलाचे काम हे चौपदरी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष्मीकांत जाधव व पराग गोसावी यांच्यासमवेत चर्चा करून पुलाचे काम कशा प्रकारचे होईल, याबाबत आ. जयंत पाटील यांनी पूर्ण माहिती घेतली.
तब्येतीत सुधारणा होताच कामाला सुरुवात
मागच्या पंधरा दिवसापूर्वी आ. जयंत पाटील यांना अचानक त्रास होत असल्याने अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तब्येतीत सुधारणा होताच त्यांनी तातडीने वडखळ ते अलिबाग रस्त्याची पाहणी केली. जनतेप्रती असणारी जबाबदारी लक्षात घेऊन त्यांनी तातडीने कामाला सुरुवात केली.
मच्छी विक्रेत्यांसाठी सुसज्ज शेड उभारणार
पोयनाड ते पांडवादेवीदरम्याच्या मार्गालगत स्थानिक मच्छीविक्रेत्या उघड्यावर व्यवसाय करीत आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता मच्छी विक्रेत्यांसाठी सुसज्ज, अत्याधुनिक शेड उभाण्यात येणार असून, एक सुलभ शौचालयदेखील या शेडमध्ये बांधण्याचे आश्वासन आ. जयंत पाटील यांनी दिले.