शासकीय यंत्रणा लागली कामाला
माती उत्खननाला बसणार चाप
| उरण | वार्ताहर |
द्रोणागिरी पर्वतावर होत असलेल्या माती उत्खननामुळे पर्वत नष्ट होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने त्याची दखल जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी घेऊन त्यांनी तातडीने उत्खनन थांबविण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यासाठी जागता पहारा देण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली उरणचे प्रभारी तहसीलदार अभिजित कोल्हे यांनी उरण सामाजिक संस्था व इतर सामाजिक संघटना व पदाधिकारी यांच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेऊन द्रोणागिरी पर्वतावरील माती उत्खनन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेली अनेक वर्षांपासून द्रोणागिरी पर्वत वाचविण्यासाठी उरण सामाजिक संघटनेबरोबर इतर सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. अखेर याची दखल शासकीय यंत्रणेने घेतली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भूगर्भ तज्ञ व खनिजकर्म अधिकार्यांची समिती नेमून त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतरच ठोस निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत द्रोणागिरी पर्वतावरील माती उत्खनन थांबविण्यात आले आहे. यासाठी शासकीय यंत्रणेला कामाला लावून कर्मचार्यांचा दिवस-रात्र जागता पहारा ठेवला आहे.