| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी-कोलाड बाजारपेठेतील बसथांब्याजवळ सुरुवातीला पडलेल्या पावसातच पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा उरली नसल्याने पाण्यातच बसची वाट पाहत उभे रहावे लागत आहे. तर, बस चालकांना देखील बस कोठे उभी करावी? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे प्रवाशांसहित वाहनचालकांची देखील तारांबल उडत आहे. त्यामुळे महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल, परंतु तात्पुरती उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रवासीवर्गाकडून बोलले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपादरीकरणाचे काम गेली 18 वर्षांपासून सुरू आहे. परंतु, अद्याप मुंबई-गोवा महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वनवास कधी संपणार, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी आंबेवाडी नाक्यावर निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे पुराचा धोका वाढणार असल्याची बातमी ‘कृषीवल’मधून प्रकाशित झाली होती. ती बातमी तंतोतंत खरी ठरली असल्याचे सुरुवातीच्या पावसातच दिसून येत असून आंबेवाडी येथे तात्पुरता बांधण्यात आलेल्या बसथांब्याजवळ पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीआधी कोलाड नाक्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला जोरदार सुरूवात करण्यात आली होती.कामाची परिस्थिती पाहता हे काम येत्या जुनपर्यंत पूर्ण होईल, असे वाटत होते. परंतु, त्यानंतर हे काम मंदावले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे काम निवडणुकी पुरते भासविण्यात आल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे येथील नागरीकांना पाण्यातील प्रवासासह मार्गावरून होत असलेल्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंबेवाडी बसथांब्याजवळ पाणीच पाणी
