। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील स्थानिक गावकर्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी जेएसडब्ल्यू फाउंडेशनने या भागातील नैसर्गिक स्रोतांची पुनःस्थापना व व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. गावकर्यांना पाणीपुरवठा सहज उपलब्ध करून देणे आणि या भागातील हरित आच्छादन वाढविणे यावर या उपक्रमांतर्फे भर देण्यात आला आहे.
कंपनीतर्फे स्थानिकांना 53,500 घनमीटर पाणी घरगुती वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, 14,500 घनमीटरचे जलसाठे तयार करण्यात आले आहेत आणि स्थानिकांसाठी 600 घनमीटरचे पेयजलसाठे तयार करण्यात आले आहेत. बंधारे, पर्जन्यजलसंधारण व साठवणूक रचना, सामुदायिक तलावांची पुनःस्थापना व दुरुस्ती, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम, पेयजलाची जलवाहिनी तयार करणे इत्यादी माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीतर्फे जेएसडब्ल्यू कारखान्याच्या परिसरात असलेल्या 11 ग्रामपंचायतींमधील सुमारे 50 गावांना सातत्यपूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी जेएसडब्ल्यू पाटणसई ते जेएसडब्ल्यू डोल्वी कारखान्यापर्यंत नवी 25 किमी लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. डोलवी निगडे, नारंगी, दादर, रावे, बहिरामकोटक, मोठे वाढव, शिर्की व बोरी येथे सामुदायिक तलावांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कुसुंबळे आणि चोरढे ग्रामपंचायतींमध्ये बंधारे बांधण्यात आले आहेत. साळव येथे पाण्याच्या उन्नत टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे आणि संजयनगर येथे जमिनीलगत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. खारेपाटमध्ये (सालिने भाग) पर्जन्यजलसंकलन व साठवणूक बांधकाम करण्यात आले आहे. शिर्की, बोरी, खारढोंबी, शहापूर आणि धेरांड येथे पेयजलवाहिनी बांधण्यात आली आहे. तलुक्यांमधील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरठा करण्यात आला. समुदायातील सदस्यांतर्फे स्वतंत्रपणे जलउपक्रम राबविण्यात यावेत यासाठी 20 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्तरीय जल समित्यांची स्थापना करण्यात आली. गावकर्यांना सुरक्षित पेयजल उपलब्ध होईल, याची खातरजमा करण्याची जबाबदारी या ग्रामसमित्यांवर असते.
खारफुटीची पुनःस्थापना
जेएसडब्ल्यूने त्यांच्या खारफुटी पुनःस्थापना प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील हरित आच्छादन वाढविले आहे. गेल्या पाच वर्षांत हरित आच्छादन 15 लाख खारफुटीची रोपे लावून, खारफुटी नष्ट झालेली 310 हेक्टर जमीन पुन्हा एकदा हरित आच्छादनांतर्गत आणली आहे. या खारफुटी पुनःस्थापना प्रकल्पात 195 स्थानिक बचत गटांमधील एकूण 2000 महिला सहभागी झाल्या होत्या. यात बहिरामकोटक, घोडबंदर, मंत्रीवाडी, जानवली, ठाकुरबेडी इत्यादी नऊ गावांचा समावेश होता. गेल्या 12 महिन्यांत जेएसडब्ल्यूने 70 हेक्टर जमिनीवर 350,000 खारफुटींची पुनःस्थापना केली. या उपक्रमात 100 बचतगटांमधील 1000 महिला सहभागी झाल्या होत्या.
20 टन कचर्याचे व्यवस्थापन
जेएसडब्ल्यूतर्फे, घरगुती घनकचरा व्यवस्थापनासाठी स्थानिकांना मदत करण्यासाठी नियमितपणे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. या प्रयत्नांच्या माध्यमातून जेएसडब्ल्यूने शाश्वत मार्गाने आसपासच्या गावांमधील 20 टन घनकचर्याचे व्यवस्थापन केले आणि याचा या भागातील 1700 कुटुंबांना लाभ झाला आहे.
कारखान्यात प्रदूषणावर नियंत्रणाच्या प्रयत्नांना या भागातील हरित आच्छादन वाढविण्याच्या प्रयत्नांचे सहाय्य लाभले आहे. त्याचबरोबर स्थानिकांना घरगुती वापरासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. खारफुटी पुनःस्थापना प्रकल्पात आसपासच्या गावांतील 2000 महिलांचा सहभाग आहे. पाण्याशी संबंधित उपक्रम 20 जलसमित्यांतर्फे राबविण्यात येतात. या समित्यांमध्ये 400 सदस्य आहेत. स्थानिकांशी भागीदारी केल्याने त्यांच्या गरजा नीट समजून घेतल्या जातात आणि जेएसडब्ल्यू त्या परिणामकारकतेने हाताळते.
गजराज सिंग राठोड, जेएसडब्ल्यू स्टीलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर
जेएसडब्ल्यूचा एकत्रित जल, नैसर्गिक स्रोत व कचरा व्यवस्थापन कार्यक्रम सहयोगात्मक विकासाला आणि जल, जमीन व संबंधित स्रोतांचे व्यवस्थापनास चालना देतो. आर्थिक व सामाजिक कल्याण साधण्याच्या उद्दिष्टाने हे कार्यक्रम राबविण्यात येतात. असे करताना महत्त्वाच्या परिसंस्थेबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड न करता हे साध्य करण्यात येते. गाव आणि समुदायाशी संबंधित उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी आणि स्थानिक उपजीविकेच्या संधींशी पाणी आणि परिसंस्था पुनर्संचयित करण्यात समुदायाच्या सक्रिय सहभागाला प्राधान्य दिले आहे.
अश्विनी सक्सेना, जेएसडब्ल्यू फाउंडेशन सीईओ