जलसंवर्धनाला कृतीची जोड हवी: प्रतिक कोळी

पीएनपी संकुलात जलदिन साजरा

। रेवदंडा । वार्ताहर ।

निसर्ग किंवा जीवनचक्र याच्या संवर्धनाच्या वेळी मानवी समूहाकडून पवित्र वचने, खूप मोठी आश्‍वासने किंवा इव्हेंटबेस उपक्रम राबविले जातात. मात्र, निसर्ग संवर्धन असो किंवा जलसंवर्धन या प्रत्येक अभियानाला माणसाकडून वैयक्तिक पातळीवर प्रत्यक्ष कृतीची जोड मिळायला हवी, असे प्रतिपादन युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतीक कोळी यांनी केले आहे.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग आणि ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड तालुक्यातील काकळघर या परिसरातील प्रभाकर पाटील शैक्षणिक संकुल येथे जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी जलसंवर्धन जनजागृती कार्यक्रम प्रमुख वक्ता या भूमिकेतून ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, कृतज्ञता म्हणून निसर्गाप्रति सणोत्सव साजरे करणे, हे काही गैर नाही. मात्र, आपल्या भावी पिढीसाठी निसर्गाचे आणि निसर्गातील प्रत्येक घटकाचे संवर्धन करायचे असेल तर नित्य जीवनात चांगल्या सवयी अंगीकारून आपण मोलाचे योगदान देऊ शकतो. तेव्हा वैयक्तिक पातळीवर अधिकाधिक प्रमाणात जलसंवर्धन करूया, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा व विजेत्यांचा पदक, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिस्तबद्ध तथा सुनियोजित स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन संकुलातील सहा. शिक्षक मनोज सुर्वे तर आभार प्रदर्शन नंदू वारगुडे यांनी केले.

यावेळी, माजी ग्रामपंचायत सदस्य गीता नागोटकर, ओएसिस संस्थेचे सहखजिनदार सार्थक गायकवाड, उपक्रम प्रभारी दर्श नागोटकर, शैक्षणिक संकुलाच्या मुख्याध्यापिका वैभवी मेहतर, सहा. शिक्षिका संपदा भोईर, संगीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version