पावसाळा लांबल्याचा परिणाम; नगराध्यक्षांकडून शर्थीचे प्रयत्न
| नेरळ | प्रतिनिधी |
थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, वाढत्या मागणीमुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात पाण्याचे नियोजन बिघडल्याने स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने माथेरानमधील पाणीसंकट अधिक गडद झाले असून, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
माथेरानला मुख्यतः शार्लोट तलाव आणि नेरळ-कुंभे येथून पाणीपुरवठा केला जातो. नेरळ-कुंभे येथून माथेरानपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी दीड तासांहून अधिक वेळ लागतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास शार्लोट तलावातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र, यंदा सर्व काही सुरळीत असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून डिसेंबर महिन्यापासून शार्लोट तलावातून मोठ्या प्रमाणात पाणीउपसा करण्यात आला. परिणामी, मे महिन्यातच माथेरानमध्ये पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे.
स्थानिक नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दुसरीकडे मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना मात्र सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शार्लोट तलाव तळ गाठण्याच्या स्थितीत पोहोचल्याने माथेरानमधील पाणीसंकट अधिक गंभीर बनले आहे.
डिसेंबरपासून शार्लोट तलावातून सातत्याने पाणी उपसा सुरू ठेवण्यात आला, तर नेरळ येथून अत्यल्प प्रमाणात पाणी घेण्यात आल्याने एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती अधिक बिकट झाली. यामुळे स्थानिकांसह पर्यटक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान नगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नवीन पंप खरेदी, अधिक वेळ पाणीउपसा आणि वितरण व्यवस्थेचे काटेकोर नियोजन यावर भर देण्यात येत असून, नगराध्यक्ष स्वतः पाणी वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.
उद्यानांना अग्निशमन बंबातून पाणीपुरवठा
माथेरान शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या दोन उद्यानांमधील आकर्षक फुलझाडे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. या उद्यानांतील झाडे वाचवण्यासाठी नगरपालिकेने अनोखी उपाययोजना केली आहे. पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ब्रिटिशकालीन पेमास्टर विहिरीतून पाणीउपसा करून ते उद्यानांमध्ये सोडले जात आहे. नगरपालिकेच्या या प्रयत्नामुळे उद्यानांतील हिरवळ टिकवून ठेवण्यास मदत होत आहे.







