लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होण्याची शक्यता
। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्थानिकांना विश्वासात न घेता नवेदर बेली येथील जलजीवन मिशनचे काम केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांनी केला आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु ठोस कारवाई करण्यास प्रशासन उदासीन ठरल्याने पुन्हा हा प्रकार सुरु असल्याने संतप्त झालेल्या राऊत यांनी अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे या कामाबाबत लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे जलजीवनचे काम वादाच्या भोवर्यात सापडले असून शिंदे गटातील सरपंच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीदेखील होणार असल्याचे चित्र आहे.
अलिबाग तालुक्यातील ढवर ग्रामपंचायत हद्दीतील नवेदर बेली येथील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन योजना राबिण्यात आली. लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. नवेदर बेलीमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गेल्या दीड वर्षापुर्वी घरोघरी नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात आले. पाईपलाईन टाकण्यापासून पाण्याची टाकी उभारणीपर्यंतची कामे केली जात आहेत. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नरेंद्र राऊत यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात आला होता. नवेदरबेली, ढवरपाडा नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत होत असलेल्या या कामाबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या योजनेसाठी बसविण्यात येणारे पाईप काही ठिकाणी जूनेच वापरले जात आहेत. खोदकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ही बाब निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे काम बंद करण्यात आले होते. मात्र पुन्हा 14 ऑक्टोबरपासून ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता, तसेच त्यांना विश्वासात न घेता पूर्वीप्रमाणेच काम सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
तसेच इतरही अनेक शासकिय कामे ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आली आहेत. ही सर्वच कामे निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत ढवरच्या ग्रामसेवक सुप्रिया नाईक, ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वनाथ गावंड, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी वेंगुलकर, तसेच उपअभियंता यांचा सहभाग असून या कामात सर्वांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांकडे ही तक्रार केली आहे. त्यामुळे जलजीवनची योजना वादाच्या भोवर्यात सापडत असताना संबंधित अधिकारी देखील अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जलजीवन मिशनच्या कामाबाबत होणार्या भ्रष्टाचाराची तक्रार केल्याबाबत विचारणा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी मोबाईलवर माहिती देणे टाळले. परंतु जे काही होईल त्याबाबत प्रेसनोट दिली जाईल, असे ते म्हणाले.