आरोग्य केंद्रात पाणीटंचाई

कोल्हारे, नेरळ ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यास अडचणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात सर्वाधिक रुग्णसेवा असलेल्या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र तेथील पाणीटंचाईमुळे चर्चेत आले आहे. तेथे पाणीपुरवठा करणार्‍या कोल्हारे आणि नेरळ ग्रामपंचायतीमधील नळपाणी पुरवठा योजनेचे पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे रुग्णांना नेरळ स्थानकात जाऊन पिण्याचे आणि वापरासाठी पाणी आणावे लागते. दरम्यान, कोल्हारे ग्रामपंचायतीकडून तेथील सर्व पाणी जलवाहिन्यांची तपासणी सुरू असून, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असा विश्‍वास कोल्हारे ग्रामपंचायतीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेचे नेरळ रेल्वे स्थानकाला लागून असल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्यातील इतर आरोग्य केंद्राच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असतात. रुग्णांची संख्या आणि तेथे होणारे शस्त्रक्रिया लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणीपुरवठ्यासाठी दहा हजार लीटर पाणी क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. हे प्राथमिक आरोग्य केंद्र कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत येत असून, तेथे येणारे रुग्णांसाठी नेरळ ग्रामपंचायत आणि कोल्हारे ग्रामपंचायत यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिन्यापासून या दोन्ही ग्रामपंचायतींकडून येणारे पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात येत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेले रुग्णांना प्रसंगी बाहेरून पाणी आणावे लागते. काही रुग्ण नेरळ रेल्वे स्थानकात जाऊन पाणी आणताना अनेक लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर टीका होऊ लागली आहे.

नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. केंद्रात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही आणि स्वच्छतेचीही पुरेशी काळजी घेतली जात नाही. अनेकदा महिला प्रसूतीसाठी येथे दाखल असतात. पण, त्यांच्यासाठीही आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मागील पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने रुग्णांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी आणण्यासाठी त्यांना दूरवर जावे लागते. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोक उपचारासाठी येतात, कारण नेरळ परिसरातील गरीब जनतेसाठी हे एकमेव सरकारी उपचार केंद्र आहे. वारंवार तक्रारी करूनही आरोग्य केंद्रातील कर्मचारीवर्गाच्या उदासीनतेमुळे रुग्णांच्या तक्रारींवर लक्ष दिले जात नाही. स्थानिक लोकांनी या समस्येबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रामधील पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेचे पाणी पोहोचत नाही. त्यासाठी कोल्हारे आणि नेरळ ग्रामपंचायतीकडून जलवाहिन्या खोदून पाण्याची गळती कुठे आहे काय? हे तपासण्याचे काम करीत आहे. आज त्या सर्व कामगारांना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारीदेखील मदत करीत आहेत.

Exit mobile version