धरणासाठी जागा देणार्‍या गावात पाणी टंचाई

। पनवेल । वार्ताहर ।

खारघर उपनगरात भर पावसातही पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने उपनगराला खेटून असणार्‍या ओवेकॅम्प या गावातील प्रत्येक घरासमोर पाणी साठविण्यासाठी 200 लिटर प्लास्टीकचे पिंप घराच्या प्रवेशव्दारावर उभी करून ठेवल्याचे दिसून येते. या गावर्‍यांच्या नळांना सिडको महामंडळाचे पाणी दोन दिवसातून एकदा येते. त्यामुळे पावसाचे पाणी प्लास्टिकच्या पिंपामध्ये साठवण्यासाठी अशी पिंप घराबाहेर ठेवली जात आहेत. सध्या ओवे कॅम्पमधील गावकरी घराच्या छतावरुन पडणारे पावसाचे पाणी या पिंपात साठवून त्यांचे दिवसाचे पाणी व्यवस्थापन करतात. विशेष म्हणजे याच ओवेकॅम्प गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या हक्काची जागा कोयना धरणासाठी राज्य सरकारला दिल्यावर त्यांचे खारघर येथे पुनर्वसन करण्यात आले. त्याच गावकर्‍यांना या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ओवे कॅम्प या गावाची लोकसंख्या दोन हजारांवर पोहचली आहे. भाडेकरुंची संख्या या गावात मोठी आहे. खारघर उपनगरातील कामगारवर्ग याच गावात राहतो. या गावात राहणारे ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले श्रीरंग भातोसे यांनी दिलेल्या माहितीनुसार 1961 साली ओवे कॅम्पवासियांना खारघरनजीक पुनर्वसित म्हणून राज्य सरकारने वसवले. मात्र सध्या या गावात सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. सिडको मंडळाने या गावाचे अद्याप हस्तांतरण न केल्याने पनवेल महापालिका व सिडको मंडळ यांच्या प्रशासकीय वादामुळे या गावाला पुरेसे पाणी मिळू शकले नाही. 63 वर्षांपासून हे गावकरी येथे राहत असले तरी प्रशासनाला या गावकर्‍यांना पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी असे वाटत नसल्याने येथील महिला ग्रामस्थ संताप व्यक्त करतात.

गावात सध्या असणार्‍या जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने दोन दिवसाआड पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. खारघर हे नवी मुंबईतील सर्वात स्मार्ट शहर म्हणून ओळखले जात असले तरी येथील मूळनिवासी तहानेने व्याकुळ झाले आहेत. सिडको मंडळाचे उच्चपदस्थ अधिकारी खारघर परिसरात देशातील सर्वोत्तम प्रकल्प आणून शहर सुंदर व आकर्षक बनविण्याकडे कल ठेवतात. मात्र पिण्याचे पाणी नसलेल्या शहरवासियांची समस्या कायमची मिटविण्यासाठी तळमळीने पाठपुरावा करणारे अधिकारी दिसत नसल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.

सिडकोच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनूसार पनवेल महापालिकेकडे गावांची जबाबदारी असून गावांमध्ये जलवाहिनी, जलकुंभ उभारणे हे काम महापालिका करत. ओवे कॅम्प या गावामध्ये सुद्धा अंतर्गत पाणी पुरवठा पनवेल महापालिकेकडून होत असला तरी सिडको सद्यस्थितीमध्ये गावाच्या मुख्य जलवाहिनीपर्यंत पाणी पुरवठा करते. ग्रामस्थांच्या मागणीनंतर पनवेल महापालिकेने या गावासाठी पाण्याची टाकी बसविली असून दररोज सिडकोकडून पुरेसा पाणी पुरवठा या गावात केल्याचा दावा सिडकोच्या अभियंत्याने केला आहे. ग्रामस्थांच्या मागणीनंतर मोठ्या व्यासाची जलवाहिनी सिडकोने गावात दिली आहे. पनवेल महापालिका व सिडको यांच्या संयुक्त पथकाने गावाची लोकसंख्या नेमकी किती, त्यानंतर पाण्याची मागणी व वापर यानंतर कायमस्वरुपी पाणी प्रश्‍नावर मार्ग काढता येईल असेही स्पष्ट केले.

Exit mobile version