। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक गावात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शासनाने जलसंधारणासाठी दोन बंधारे आणि तीन विहिरींसह कोट्यवधी रुपये खर्च करूनही गावातील महिलांना फक्त हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल चालावे लागत आहे.
गावाला आठवड्यातून केवळ चार दिवसच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाच्या योजनेतून 2018-19 मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 22 लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रीट बंधारा बांधण्यात आला होता. मात्र, निकृष्ट दर्जामुळे तो काही महिन्यांतच वाहून गेला आणि पुन्हा एकदा गावकर्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागले. गेल्यावर्षी 2023-24 मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 49.31 लाख रुपयांची तरतूद करून नव्या बंधार्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु, या वर्षीच्या पावसाळ्यानंतरही त्या बंधार्यात पुरेशी पाणी साठवण होऊ शकली नाही. गावकर्यांचा आरोप आहे की, या कामातही दर्जाचा पूर्ण अभाव होता, त्यामुळेच आजही त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की, निकृष्ट काम करणार्या ठेकेदारांवर आणि दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.