सांडपाण्यावर प्रतिबंध करणार्या प्रकल्पाची गरज
। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील सव्वीस गाव पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने महिला भगिनींनी एकत्र येत रोहा तहसील कार्यालयावर आंदोलनाची हाक दिली आहे. शासनाने करोडोंचा निधी या सव्वीस गाव पाणीपुरवठा योजनेवर खर्च केला असूनदेखील हा निधी कुठे गेला, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहत स्थापन होऊन सुमारे चाळीस ते पन्नास वर्षे होत आहेत. बारा महिने वाहणार्या कुंडलिकेच्या अस्तित्वामुळेच लक्ष्मीची पावले रोह्याकडे वळली आहेत. सहाजिकच येथील तरूण चाकरमानी न होता येथेच रोजगार उपलब्ध करेल आणि शक्यतो गाव सोडणार नाही. भविष्यात रोह्यातील लोकसंख्याही घटणार नाही. उलट वाढेल याचा अंदाज असतानाही प्रशासनाने उपलब्ध असलेल्या पाणी नियोजनासाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने आज आसपासच्या गावातील लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. कुंडलिका नदी संवर्धन हे केवळ पावसाळ्यात नदीचे पाणी गावात शिरू नये याकरिताच प्रयोजन होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नदीचे मूळ अस्तित्व टिकवण्यासाठी कोणतेच प्रयत्न झालेले दिसत नाहीत. उलट शहरातील घाण सांडपाणीच नदी पात्रात सोडले जात आहे.
नगरपालिकेकडे स्लजविल्हेवाट प्रकल्प केवळ दाखवण्यासाठी नियोजनात आहे. कारण नगरपालिकेकडे तशी जागाच उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. जर नगरपालिकेने नदीच्या किनारी असलेल्या गावांचे व उद्योगांचे सांडपाणी नदीत सोडण्यास प्रतिबंध करणारा प्रकल्प हाती घेतला तर सव्वीसच काय, सव्वीसशे गावांना पाणी पुरवठा होऊ शकेल. परंतु, एवढे पाणी खाडीत वाहून जात आहे. त्याचे दुष्परिणामही वर्तमान लोकांना भोगावे लागत आहेत. त्याचबरोबर पुढे देखील आणखी भयावह परिस्थिती होऊ शकते. यासंदर्भात अनेक वेळा शासनदरबारी लेखी पाठपुरावा करण्यात आला आहे. शासन लोकोप्रयोगी असे अनेक प्रकल्प हाती घेत असते, त्याचप्रमाणे प्रदुषणमुक्त नदी प्रकल्प शासनाने हाती घ्यावा आणि पुढील अनेक वर्षांच्या तहानेची तरतूद करावी, असा पत्रव्यवहार ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांनी श्रीवर्धन, अलिबाग, पेणचे आमदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे.