। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात श्री शिंग्रोबा मंदिराजवळ मोठा धबधबा रस्त्यावर पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहन चालकांसह प्रवासी आणि स्थानिक नागरीकांमध्ये भितीचे वातवरण पसरले आहे. मात्र ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे खालापूर तालुक्यातील पातळगंगा नदीसह, छोट्या-मोठ्या नदीनाल्यांना पूरपरिस्थिती असताना खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, पोलिस निरिक्षक अनिल विभूते, शिरिष पवार यांच्या टिमसह आपघातग्रस्त टिम आहोरात्र आपत्कालीन परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी लक्ष ठेवून आहे.
बुधवारी (दि.13) पातळगंगा नदीत खोपोली हाद्दीत साईबाबा नगर परिसरात दोन मुले बुडल्याची माहिती पसरताच तहसिलदार संपूर्ण टिमसोबत तातडीने घटनास्थळी पोहचून पाहणी केली. मात्र ती अफवा असल्याचे समजले. त्यानंतर गूरुवारी (दि.14) बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ रस्त्यावर धबधबा वाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई -पुण्याहून प्रवास करणार्या प्रवाशांसह खोपोलीकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
तहसिलदार आयुब तांबोळी यांनी हा व्हायरल व्हिडिओ गेल्या पंधरा दिवसांपासूनच समाजमाध्यमांवर फिरत आहे, असे सांगत बोरघाटात ढगफुटीसारखा पाऊस पडत नसून नागरिकांनी तसेच प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.
हा प्रकार बोरघाटातील श्री. शिंग्रोबा मंदिराजवळ घडूच शकत नाही. कारण तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता पाणी उताराकडे वाहिले पाहिजे. त्या मंदिरालगत असलेल्या डोंगराच्या मागील बाजूस कोणतीच अशी जागा नाही की तेथे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून येईल. फक्त माहोल बनवण्याकरता काही गैर माध्यमानी चुकीचा व्हिडिओ या नावे व्हायरल केलेला आहे.
– गुरूनाथ साठेलकर, अपघातग्रस्त सामाजिक संस्था