असा आम्ही काय केला गुन्हा..

जाळ्यात अडकून मृत्यूमुखी पडलेल्या पक्ष्यांचा सवाल

| पनवेल | प्रतिनिधी ।

निसर्गात मुक्तपणे वावरणार्‍या पशु,पक्ष्यांचा अनेकदा मानवी चुकीमुळे मृत्यू होतो. त्यातून अनेक पशु,पक्षी आपला प्राण गमावत असतात. यामुळे पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होत आलेल्या आहेत. अशा मानवी चुकामुळे पनवेल परिसरात विविध ठिकाणी जाळ्यात अडकून पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे विदारक दृष्य नजरेस पडले आहे. ते पाहून हे पक्षी देखील म्हणत असतील असा आम्ही काय केला गुन्हा. याचे उत्तर ज्यांनी या जाळ्या लावल्या त्यांनाच द्यावे लागणार आहे.

रविवार असल्याने पनवेलमधील पक्षी निरीक्षक माधव आठवले हे पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने बाहेर भटकंती करीत असताना त्यांना वावंजे रोडवरुन एक्स्प्रेस वे कडे जाताना एक डम्पिंग ग्राऊंड लागते. त्या शेजारीच एक पाण्याचा तलाव आहे. डम्पिंग ग्राऊंडवर पडलेले अन्न सेवन करण्यासाठी हे पक्षी येत असतात. शेजारीच पाण्याचाही तलाव असल्याने त्या ठिकाणी हे पक्षी आपली तहानही भागवतात. त्याच परिसरात अज्ञातांनी ठिकठिकाणी जाळ्या लावून ठेवल्या आहेत. भक्ष्य शोधण्यासाठी तसेच पाणी पिण्यासाठी येणारे असंख्य पक्षी या जाळ्यात अडकून फसतात. काहीजण सुटतात तर काहीजणांना आपले प्राण गमवावे लागतात. आठवले यांना या जाळ्यात अनेक पक्षी असेच अडकून मृत झाल्याचे दिसून आले.

यानिमित्ताने आठवले यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. अनेक पक्षी पाणी पिण्याकरता तसेच भक्ष्य शोधत असतात. या जाळ्या कोणी लावल्या हा प्रश्‍न उभा राहत आहे, आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का? असा सवाल या पक्ष्यांनी विचारला तर त्यात गैर काय, अशी विचारणाही आठवलेंनी केली आहे.

जर प्रशासन, पक्षीप्रेमी यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर पक्षी केवळ आपल्याला पुस्तकातील चित्रातच दिसतील,अशी भीतीही व्यक्त केली आहे. थंडी दिवसात अनेक पक्षी हजारो मैल प्रवास करून पनवेलमध्ये दाखल होत असतात. सकाळी प्रहरी विविध पक्ष्यांच्या आवाजाचे तसेच अनेकदा प्रत्यक्षात दर्शन होत असतात, त्यांना वाचविणे सर्वांचे कर्तव्य आहे.

माधव आठवले, पक्षीप्रेमी
Exit mobile version