मृत्युपूर्वी नितिन देसाई काय म्हणाले!

मोदी साहेब एनडी स्टुडिओ वाचवा
| मुंबई | प्रतिनिधी |
एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका. केंद्र, राज्य शासनाने या एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावं अशी माझी इच्छा आहे. मराठी, हिंदी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा. कारण एन.डी.स्टुडिओ हे नितिन देसाई म्हणून नाही तर एका मराठी माणसाने उभं केलेलं मोठं कलामंच आहे. अशी आर्त विनवणी आत्महत्या करण्यापूर्वी नितीन देसाई यानी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

चित्रपटसृष्टीतील सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (दि.2) पहाटे कर्जत येथील एन.डी. स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या या धक्कादायक एक्झिटमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. खालापूर पोलिसांनी एन.डी. स्टुडिओतील नितीन देसाई यांचा मृतदेह खाली उतरवल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांना नितीन देसाई यांच्या मृतदेहाजवळ एक व्हॉईस रेकॉर्डर मिळाला होता. हा व्हॉईस रेकॉर्डरच नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीतील महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नितीन देसाई यांनी कुटुंबातील व्यक्तींबरोबरच आपल्या वकिलासाठी एक मेसेज रेकॉर्ड करुन ठेवला होता. व्हॉईस रेकॉर्डरमध्ये एकूण 11 ऑडिओ क्लीप्स आहेत. त्यापैकी एका ऑडिओ क्लीपमध्ये नितीन देसाई यांनी त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या गोष्टींविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे. ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले पहिले वाक्य आहे. यासोबतच नितीन देसाई यांनी एका क्लीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत त्यांच्याकडे एक विनंती केली आहे.

आपण ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्याकडून फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप नितीन देसाई यांनी केला. तसेच कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, यासाठी नितीन देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या मागण्यांसंदर्भात काय पावलं उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

विधानसभेत पडसाद
नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. भाजपचे आशिष शेलार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचा स्टुडिओ गहाण होता. याबाबत कोर्टाचा निकाल त्यांच्याविरोधात गेला होता. आशिष शेलार यांनी हा जो विषय मांडला ते तपासून घेऊ. याप्रकरणात जाणीवपूर्वक स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी काही केलं गेलंय का? जबरदस्ती केली गेलीए का? नियमा बाहेर जाऊन व्याज लावले का? याची चौकशी सरकार करेल. एका मराठी माणसाचा स्टुडिओ आहे. कायदेशीर बाजू तपासून घेऊन आठवण म्हणून स्टुडिओचं काय करता येईल? याबाबत कायदेशीर बाब तपासून घेऊ, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

Exit mobile version