| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 2017 पासून सुरुवात झालेली होती. नेरळ गावातील बहुसंख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले. मात्र, त्यावेळी रस्त्यात उभे असलेले विजेचे खांब आजही तसेच उभे आहेत. नेरळ खांडा पूल येथील विजेचा खांब महावितरण कंपनीने हलविला आहे, मात्र नेरळ बाजारपेठेमधील अनेक विजेचे खांब आजही तसेच उभे आहेत. दरम्यान, नेरळ विकास प्राधिकरणकडून ते विजेचे खांब हलविण्यासाठी निधी दिला जाणार असल्याची आश्वासने दिली जात आहेत, परंतु कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील रस्त्यांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमधून करण्यात आली आहेत.2017 पासून नेरळ गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत होते. त्यावेळी प्राधिकरणकडून कामे करण्यात आली; परंतु रस्ताच्या कडेला असलेले विजेचे खांब होते तेथेच कायम आहेत. बाजारपेठ भागातील रस्त्यात काही ठिकाणी अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले, परंतु रस्त्यातील विजेचे खांब महावितरण कंपनीकडून अद्याप बाजूला करण्यात आलेले नाहीत. त्यात अनेक विजेचे खांब हे अगदी रस्त्याच्या मधोमधदेखील आहेत आणि त्यामुळे त्याचा फटका वाहतूक कोंडी होण्यास होत असतो.त्यामुळे ते विजेचे खांब रस्त्यातून हलवून रस्त्याच्या कडेला घेण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, अनेक वर्षे लोटली तरी नेरळ गावातील रस्त्यांमध्ये असलेले विजेचे खांब हलविण्यात नेरळ विकास प्राधिकरण यशस्वी ठरलेले नाही.
नेरळ विकास प्राधिकरणकडून नेरळ गावातील रस्त्यात असलेले विजेचे खांब बाजूला करण्याची मागणी नेरळ ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, नेरळ ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत असलेल्या अनेक वर्षाच्या मागणीला प्राधिकरणकडून केराची तोडली दाखवली जात आहे. दुसरीकडे नेरळ गावातील विजेचे खांब हलविण्यासाठी महावितरणकडून काही निधीची मागणी करण्यात येत असते. महावितरणकडून त्या मागणीसाठी कोटेशनदेखील नेरळ विकास प्राधिकरणकडे दिले आहे. मात्र, नेरळ विकास प्राधिकरणकडून नेरळ गावातील रस्त्यांमध्ये असलेले विजेचे खांब बाजूला करून देण्यात कोणत्याही प्रकारची निधी उपलब्श करून देण्याची कार्यवाही होत नसल्याने नेरळ ग्रामस्थ नाराज आहेत.
नेरळ गावातील खांडा पूल येथे विजेचे खांब उभे होते. ते विजेचे खांब हलविण्यात यावे यासाठी टॅक्सी संघटनेच्या पुढाकाराने घेतला आणि महावितरण कार्यालयाची मदत घेऊन दोन्ही खांब रस्त्यातून बाजूला काढून घेत रस्त्याच्या कडेला उभे करून घेतले. नेरळ खांडा पुलाजवळ रस्त्यातील विजेचे खांब बाजूला करण्यात येतात, मात्र गावातील अन्य भागातील विजेचे खांब महावितरण बाजूला करीत नसल्याने नेरळ ग्रामस्थ नाराज आहेत. त्या खांबामुळे अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्राधिकरणाची राहील.
गोरख शेप,
मानवाधिकार कार्यकर्ते
