मुरूडमधील पर्यटन विकास कधी?

सनसेट पॉईंट वनखात्याच्या परवानगीत अडकला; विद्यमान आमदारांचे दुर्लक्ष

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

दरवर्षी लाखो पर्यटक मुरूड तालुक्यातील जंजिरा किल्ल्याला भेट देत असतात. या किल्ल्याकडे जाणारा रस्ता उंच अश्या डोंगरातून जात असून त्याच्या एका बाजूला अथांग समुद्र आहे. या ठिकाणी सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पहाण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र, या ठिकाणी पर्यटकांची मोठी गैरसोय होते. शेतकरी कामगार पक्षाच्या दिवंगत नेत्या मा.आ. मिनाक्षी पाटील यांनी या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी निधी देखील मंजूर करून घेतला होता. मात्र, हा प्रकल्प गेली 7 वर्षे वनखात्याच्या परवानगीमध्ये अडकला आहे. त्यामुळे याकडे विद्यमान आमदारांचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.

मुरुड तालुक्याला पर्यटनाचा ‌‘ब’ दर्जा प्राप्त आहे. त्यासाठी पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी शासनाकडून निधी मिळणे खूप आवश्यक आहे. येथील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. जंजिरा किल्ला हा राजपुरी गावात असल्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी डोंगरी गावाला वळसा घालून जावे लागते. हा मार्ग उंच अश्या डोंगरातून जात असून एका बाजूला अथांग समुद्र असल्याने येथे सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पहाण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र, या ठिकाणी पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे आणि उंच चौथरा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. डोंगरी-राजपुरी रस्त्यावर सनसेट पॉइंटचे सुशोभिकरण केल्यास एकदरा, डोंगरी, माझेरी व राजपुरी येथील स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. या पॉईंटचा विकास झाल्यास किल्ल्यावर जाणारा अथवा परतणारा पर्यटक येथे क्षणभर विसावा घेऊ शकेल. त्यामुळे स्वयंरोजगाराला आपोआप चालना मिळेल.

शेतकरी कामगार पक्षाच्या दिवंगत नेत्या माजी आमदार मीनाक्षी पाटील यांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून 1 कोटीचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र, या प्रकल्पसाठी लागणारी काही जागा वनखात्याची असल्यामुळे वनविभागाकडून अद्यापही परवानगी मिळालेली नाही. 7 वर्षांपूर्वी या परिसरात प्रकल्पातील काही जागा वनखात्याची निघाली आणि आलेला निधी व प्रकल्प वनखात्याच्या परवानगीसाठी अडकला आहे. या पॉईंटच्या विकासासाठी 7 मीटर रस्त्यापासुन एक फूट उंचीची संरक्षक भिंत, सेफ्टी गटर, रेलींग, 4 स्वच्छता गृहे, 15 ते 20 गाड्यांसाठी वाहनतळ, हाय मास्ट दिवे, गार्डन इत्यादी सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात मात्र या पॉईंटच्या विकासासाठी विद्यमान आमदारांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे या स्थळाचा विकास होणे कठीण होऊन बसले आहे.

Exit mobile version