जंजिरा किल्ल्यात जाणाऱ्या पर्यटकांचे हाल; कामासाठी 93.56 कोटींची निविदा
| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
मुरुड जंजिरा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी दिवाळी, नाताळ, मे महिन्याच्या सुट्टीत लाखो पर्यटक भेट देतात. परंतु, छोट्या बोटीतून किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उतरण्यासाठी जेटी नसल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा उड्या मारत जीव मुठीत घेऊन उतरावे लागत आहे. किल्ल्यात जाण्यासाठी जेट्टी मंजूर करण्यात आली असून, मेरिटाईम बोर्डाकडून सागरमाला अंतर्गत 93.56 कोटींची निविदासुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, कामाचं पुढं काय झालं, याबाबत अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे नेमकं जेट्टीचं काम अडलं कुठं, असा प्रश्न मुरुडकरांसह पर्यटकांकडून विचारण्यात येत आहे.
सध्या हिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, राज्यभरातून तसेच देश-विदेशातून दररोज हजारो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. परंतु, येथे आल्यावर या ऐतिहासिक वास्तूची झालेली हेळसांड आणि पर्यटकांचा किल्ल्यापर्यंत होणार जीवघेणा प्रवास यामुळे सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जंजिरा किल्ल्याची सफर करण्यासाठी पुरातत्व खाते 25 रुपये तिकीट आकारणी करते. परंतु, पैसे घेऊनही कोणतीही सुविधा पर्यटकांना मिळत नाही, असा त्यांचा आरोप आहे. सागरामला अंतर्गत 93.56 कोटींची निविदा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने काढली; परंतु तिचे काम सुरु कधी होणार, हा पर्यटकांना प्रश्न पडला आहे. जेटीच्या बॅक वॉटरसाठी लागणारे मोठाले त्रिकोणी दगड बनून तयार आहेत असे समजते, मग काम सुरु का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, किल्ल्यात येणाऱ्या पर्यटक महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या कमी, त्यामुळे त्यांचे हाल आहेत. त्याचप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी नाही व किल्ल्याची अधिकृत माहिती सांगणारे फलकदेखील गायब झालेत. किल्ल्यात पाहायला येताना मुरुड शहरापासून पर्यटक टोल देत देत येतो, नंतर राजपुरीला तिकिटाच्या रांगेत उभे राहावे लागते. शिडाच्या बोटीतून किल्ल्यात आल्यावर पुन्हा पुरातत्व खात्याचे तिकीट घेण्यासाठी रांगेमध्ये उभे राहावे लागते. त्यामुळे किल्ल्यात मूलभूत सुविधा नसताना पर्यटकांकडून तिकिटाचे पैसे का घेता, असा प्रश्न पर्यटकांकडून विचारला जात आहे. यावर कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही.
पर्यटकांमध्ये नाराजी
मुरुड जंजिरा किल्ल्याला दोन महत्त्वाचे दरवाजे आहेत. जिथून मुख्य गेट जेट्टी आणि तिचे प्रवेशद्वार तुम्हाला दरबार किंवा दरबार हॉलकडे नेते. जी पूर्वी तीन मजली रचना होती, पण आता ती मोडकळीस आली आहे. गडाच्या पश्चिमेस असलेल्या दुसऱ्या दरवाजाला ‘दर्या द्वार’ म्हणतात, जे समुद्रात उघडते. अशा अजिंक्य जंजिरा किल्ला पाहण्यासाठी भारतातून पर्यटक येतात. परंतु पर्यटकांना सुरक्षित प्रवेशद्वारावर उतरण्यासाठी जेटी नसल्याने पर्यटक नाराज आहे. किल्ल्यात 2007 रोजी 2 बाथरूम बांधलेत, ते सुरु झालेच नाही.
जंजिरा किल्ल्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. आत जंगल वाढले आहे. जंगलातून साप दिसतात. स्वच्छतागृहाची सोय नाही. किल्ल्याची माहिती देणारे फलक पूर्वी होते, आता नाहीत. पूर्वी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला तिकीट नव्हतं. आता 25 रुपये सुरु घेण्यात येत आहेत, ते चुकीचे आहे. आपली तक्रार घेण्यासाठी कोणताही अधिकारी किल्ल्यात नसतो. किल्ल्याचे अनेक बुरुजांना भगदाड पडले आहेत, त्यांची दुरुस्ती करणार कोण?
कस्तुरी आवटी, पर्यटक-ठाणे