मातीबरोबर निकृष्ट दर्जाचा भराव
। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण पूर्व विभागातील पिरकोन-आवरे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखत्यारीत येणार्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी मुरूम मातीबरोबर कुठल्यातरी बांधकामाचा निकृष्ट दर्जाचा भराव सर्रासपणे वापरत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत माजी सरपंच वैभवी म्हात्रे तसेच मानव विकास परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित शाखा अभियंतांना पाहणी करून कारवाई करायला सांगितले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या रुंदी करण्याच्या कामामुळे विजेचे पोल मध्यभागी येऊन अपघाताचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही येथील नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच, या मुख्य रस्त्याच्या खालून नळाची पाईपलाईन गेली आहे. त्यावर आता रस्त्याच्या रुंदीकरणाचा भराव होत आहे. त्यामुळे ही पाईपलाईन अधिकच गाडली जाणार असून, दुरुस्तीच्या वेळी मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या पाईपलाईन संदर्भात तसेच इलेक्ट्रिक खांब हटविण्याबाबत, इलेक्ट्रिक बोर्डाच्या अधिकार्यांकडे संबंधितांनी विद्युत खांबांविषयी तसेच पाईपलाईन बाबत पुनाडे आठगाव पाणी कमिटीकडे चर्चा केली की नाही, याबाबत काहीच माहित नसल्याचे वैभवी म्हात्रे व नंदकुमार म्हात्रे यांनी सांगितले आहे.
पिरकोन-आवरे या रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी जी जमीन संपादित करण्यात आली आहे, त्यानुसार या रस्त्याचे दोन्ही बाजूंनी सारखेच रुंदीकरण करून घ्यावे. मात्र, असे न होता काही नागरिकांची वॉल कंपाऊंडे तोडण्यात येत आहेत. तर, काही नागरिकांची वॉल कंपाऊंडे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे, रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची बांधकामे तोडत असताना यात राजकीय पक्षपातीपणा होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. याबाबत आवरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैभवी म्हात्रे यांनी ठेकेदाराला विचारणा केली असता, ठेकेदार थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणाचे हे काम निकृष्ट दर्जाचे असून संबंधितांनी या कामात लक्ष घालून वेळीच हे काम थांबवून घ्यावे. वरिष्ठांनीही या रस्त्याची सखोल चौकशी करून होत असलेले निकृष्ट दर्जाचे हे काम त्वरित थांबवावे.
वैभवी म्हात्रे,
माजी सरपंच, आवरे