दोन परप्रांतीय तरूणांना अटक
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत येथील दहिवली नाका येथे एका टेम्पोमधून दोन परप्रांतीय तरुण तूरडाळ तसेच बासमती तांदूळ यांची विक्री करत होते. याबाबत माहिती मिळताच कर्जत शहरातील व्यापार्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्या व्यापार्यांना लाख असलेली तूरडाळ आणि बनावट बासमती तांदूळ यांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आहे. तसेच, धान्य विक्रीसाठी कोणत्याही प्रकारचे शासकीय परवाने त्या दोघांकडे नसल्याने त्या दोन्ही तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कर्जत शहरातील दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेली मोकळ्या जागेत टेम्पो उभा करून त्यात आणलेली तूरडाळ आणि बासमती तांदूळ यांची विक्री केली जात होती. परप्रांतीय असलेले दोन तरुण गेले काही दिवस टेम्पोमधून आणलेली तूरडाळ आणि बासमती तांदूळ कमी किमतीत विकत होते. त्यामुळे गेली काही दिवस त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होत होती. याची माहिती कर्जत शहरातील मोठ्या घाऊक व्यापार्यांना मिळाली होती. त्यातील काही व्यापारी त्या ठिकाणी पोहचले असता हिंदी भाषेत संवाद साधणार्या त्या दोन तरुणांकडे असलेली तूर डाळ ही लाख असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याबाबत कर्जत पोलिसांना कळविले. त्याचवेळी त्या टेम्पोमध्ये असलेले बासमती तांदूळ हे देखील बनावट असल्याचे आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी त्या दोन्ही तरुणांकडे तूरडाळ विक्रीचे परवाने, खरेदी केल्याची पावती तसेच धान्य वितरण करण्याचा परवाना मागितला. मात्र, त्यापैकी एकही वस्तू परप्रांतीय तरुणांकडे नव्हती. शेवटी त्या दोन्ही तरुणांना त्यांच्या टेम्पोसह कर्जत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कर्जत शहरातील व्यापार्यांच्या समयसूचकतेमुळे दहिवली येथे सुरु असलेला बनावट तूरडाळ आणि बासमती तांदूळाचा गोरख धंदा उघडकिस आला आहे.