। पनवेल । वार्ताहर ।
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दुरदृष्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद साधून आपाआपल्या कार्यालयांमध्ये सात कलमी कार्यक्रम राबविण्यास सांगितले आहे. यानुसार आयुक्त मंगेश चितळे यांनी सर्व अधिकार्यांची नुकतीच मुख्यालयात बैठक घेऊन सात कलमी कृती कार्यक्रम राबविण्याबाबत आदेश दिले आहेत.
त्यानुसार प्रामुख्याने महापालिकेची सर्व कार्यालये परिसर साफसफाई व सौंदर्यीकरण, फर्निचर दुरुस्ती तसेच स्वच्छतेच्या दृष्टिने स्वच्छता मोहीम घेण्याबाबत आदेशात करण्यात आले आहे. तसेच, पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये ही स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी करणेकामी निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात स्वच्छता मोहीम घेऊन तेथील खुप दिवसांपासुन पडून असलेले व वापरात नसलेले कपाटे, खुर्च्या-फर्निचर इत्यादी साहित्य निष्कासित करण्यात आले. तसेच, प्रभाग समिती-ड कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भिंगारी कार्यालयांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच, प्रभाग 10 कळंबोली प्रभाग कार्यालय येथे मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली.