। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली सरसगड किल्ल्यावर मोठा वणवा लागला आहे. सततच्या या वणव्यामुळे किल्ल्याचे आणि त्याच्या आसपासच्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
वृक्षराजी, वनसंपदा आणि पशू-पक्षांचे अधिवास आणि अन्न जळून खाक झाले आहे. त्यामुळे हे वणवे रोखण्यासाठी ठोस उपयोजना करण्याची गरज स्थानिक रहिवासी आणि दुर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. 8 मार्च रोजी संध्याकाळी पाच ते सहा वाजल्याच्या सुमारास सरसगडावर वणवा लागल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वनक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे व संतोष भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश दबडे, वनरक्षक विनोद चव्हाण, संकेत गायकवाड, संदीप ठाकरे, जितेंद्र शिंदे, वनमजूर नामदेव पुंजारे, गोविंद लांगी, पांडुरंग पवार यांच्यासह अमित निंबाळकर व मिलिंद गोळे यांनी वणवा विझविण्याचा प्रयत्न केला. वणवा विझवण्यासाठी योग्य उपकरणे नसणे, आगीचे रुद्ररूप, झाडी-झुडपे, कुयली व तीव्र उतार आदी गोष्टींचा अडसर येतो. सरसगडावर मागील अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन केले जात आहे. मात्र, वनव्यांमुळे ही सर्व झाडे जळाली आहेत. वणव्यांमुळे येथील वृक्षराजी, वनसंपदा, पशुपक्षी यांच्याबरोबरच ऐतिहासिक ठेवा देखील धोक्यात येत आहे. परिणामी वणवे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. स्थानिक रहिवासी आणि दुर्गप्रेमींनी वणवे रोखण्यासाठी ठोस उपयोजना करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने तात्काळ उपाययोजना करून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पाऊले उचलावीत असे स्थानिकांचे म्हणणे आहे.