। चिरनेर । प्रतिनिधी ।
महिला एक शक्ती तर आहेच. परंतु तिच्यात जग बदलण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे चांगली मुले घडविणे हि प्रत्येक आईची जबाबदारी आहे. असा मौलिक सल्ला निवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी श्रीधर मोकल यांनी दिला.
चिरनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (दि.8) मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच भास्कर मोकल यांनी भूषविले होते. यापुढे बोलताना श्रीधर मोकल यांनी सध्या बोर्डाच्या दहावी- बारावी आणि शालेय परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. विद्यार्थी हे परीक्षेच्या तणावाखाली आहेत. त्यांना अभ्यासाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून, गावात जे जे कार्यक्रम साजरे केले जातात. त्या कार्यक्रमात वाजणारे लाऊड स्पीकर, बॅण्ड बाजे यांचा आवाज कमी प्रमाणात आणि तोही काही काळ प्रमाणातच ठेवण्यात यावा. यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सूचित केले.
तर आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. हा एक स्त्रीशक्तीचा अभिमान असल्याचे गौरोद्गार सरपंच भास्कर मोकल यांनी काढले. तर माजी उपसभापती शुभांगी पाटील, आशा वर्कर शोभा ठाकूर जाधव तसेच अन्य महिलांनी, महिलांचे हक्क व महिलांवरील वाढते अत्याचार याबाबत आपल्या मनोगतातून विचार मांडले. यावेळी उपसरपंच अरुण पाटील, सचिन घबाडी, संजय पाटील, समाधान ठाकूर, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, शशांक ठाकूर तसेच ग्रामपंचायतीच्या स्त्री- पुरुष महिला सदस्या, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.