। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला घरात घुसून गुंडांकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरातील फॉरेस्ट पार्कमधील ही घटना असून याप्रकरणी विमानतळ नगर पोलीस ठाण्यात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गोरखनाथ शिर्के हे निवृत्त पोलीस अधिकारी असून त्यांनी लोहगावमधील फॉरेस्ट पार्क सोसायटीत बंगला बांधला आहे. आरोपी गोविंद कॅनल याच्याकडे सोसायटीतील स्वच्छतेचे कंत्राट आहे. सोसायटीतील रस्त्यावर असलेले गटारचे झाकण तुटले होते. शिर्के यांच्याकडे एक जण मोटारीतून आला. मोटारीचे चाक झाकणावरुन गेल्याने झाकण तुटल्याचा आरोप कॅनल याने केला होता. या कारणावरुन शिर्के आणि कॅनल यांच्यात वाद झाला. त्यानंतर कॅनल आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार शिर्के यांच्या घरात शिरले. त्यांनी शिर्के यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. आरोपींनी तलवार उगारुन दहशत माजविली तसेच, शिर्के यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली.
या प्रकरणी शिर्के यांच्या फिर्यादीवरुन 10 ते 12 जणांवर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.