निवडणुकीतील युत्या-आघाड्या दिखावाच ठरणार?

निष्ठावान कार्यकर्ते मात्र अनभिज्ञ
| माथेरान | वार्ताहर |
सत्तेच्या सारीपाटासाठी इथली राजकीय पक्षांची मंडळी वेळप्रसंगी कुणाच्याही आधारावर नगरपरिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी आग्रही दिसत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकी मध्ये शिवसेनेची स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन झाली होती. सतरापैकी चौदा जागांवर त्यांनी निर्विवाद बहुमत प्राप्त केले होते. एका जागेवर काँग्रेसला समाधान मानावे लागले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात दोन जागा मिळाल्या होत्या. त्या पाच वर्षात केवळ काँग्रेस पक्षाने सत्ताधारी शिवसेनेला पाठबळ दिले नव्हते. काँग्रेसचा एकच नगरसेवक पाच वर्षे विरोधात राहिला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही सदस्य शिवसेनेच्या गोटात अप्रत्यक्षपणे सहभागी झाले होते. सत्ताधारी शिवसेनेने आपल्या परीने मागील जुन्या निधीच्या जोरावर काही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. होणार्‍या काही ठराविक निकृष्ट कामांना ठाम विरोधात जाण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत. तात्पुरता विरोध झाला होता, परंतु सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळे जवळपास निम्म्याहून अधिक कामांची बिले ठेकेदारांना अदा करण्यात आली होती.

2016 च्या निवडणुकीत ज्यांनी एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. त्या मंडळींना सुरुवातीपासून आर्थिक बाबीची पूर्तता करण्यात आल्याने सत्ताधारी सेनेला काँग्रेसवगळता कुणीच विरोधक राहिला नव्हता. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे राजकारणी कधी एकत्र झाले हे त्यांच्या कार्यकर्त्यांनासुध्दा माहीत नव्हते. काही राजकीय नेत्यांनी मागील काळात इथल्या बंगल्याचे आपल्या पोटासाठी खरेदीविक्री व्यवहार सुरू केले होते. त्यात ही विरोधक मंडळीनी गळ्यात गळा घालून वैयक्तिक कामे पूर्ण केली आहेत. नेत्यांनी फक्त एकमेकांचे हित जोपासण्यात धन्यता मानली होती. पाच वर्षे कार्यकर्त्यांना एकप्रकारे दुय्यम स्थान देण्यात आले होते. यापुढेही येणार्‍या नगरपरिषदेच्या निवडणुकी मध्ये होणार्‍या युत्या-आघाड्या ह्या केवळ दिखाव्यापुरता असणार आहेत. ठराविक मंडळीनी सभागृहात जाऊन नेहमीप्रमाणे आपले, कुटुंबाचे आणि जवळच्या नातेवाईकांचे हीत करून कार्यकर्त्यांचा सर्वच पक्ष वापर करून घेणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्यातरी दिसत आहे.

आगामी काळात विकास कामांसाठी येणार्‍या भरीव निधीवर डोळा ठेऊन सत्तेसाठी कुणाच्याही सोबत युती आघाडी करण्याची तयारी सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रकल्प माथेरानसाठी प्रलंबित आहेत, परंतु सत्तेशिवाय कामेच करायची नाही अशी स्वतःला अभ्यासू, हुशार समजणार्‍या नेत्यांची मानसिकता झाल्याने आगामी निवडणुकीत सत्तेत विराजमान होऊन प्रलंबित कामे पूर्ण करणार अशीही राजकीय मंडळी प्रामुख्याने इथेच पहावयास मिळते.

स्वार्थी नेते, निष्ठावान कार्यकर्ते
मतदारांनी निवडून दिलेले बहुतेक लोकप्रतिनिधी मागील दोन वर्षांपूर्वी आर्थिक लाभासाठी अन्य पक्षात गेले होते. निष्ठावंत कार्यकर्ता नेहमीप्रमाणे ओल्या सुक्या पार्ट्यांमध्ये सामील होऊन आपल्या नेत्यांसाठी छाती बडवणार आहे. माथेरान हे छोटेसे गाव असल्याने साहजिकच निवडणुका झाल्यावर सर्वजण सुखदुःखात एकत्रित येतात.सत्ता कुणाचीही येवो निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देऊन जे विरोधात होते त्यांची कामे मोठ्या लगबगीने पूर्ण केली जातात, हे आजवर सर्वच कार्यकर्त्यांना ज्ञात आहे, त्यामुळे आगामी काळात कुणाचा झेंडा हाती घ्यायचा हे कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे.

Exit mobile version