गरजेपोटी बांधलेली घरे कायमची होणार का?

शेकाप नेते प्रा.एल.बी.पाटील यांचा सवाल
। उरण । वार्ताहर ।
गरजेपोटी बांधलेली घरे कायमची होणार का? असा सवाल शेकाप नेते प्रा.एल.बी.पाटील यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात ते म्हणात की, 22 जूनच्या काही वर्तमान पत्रामध्ये गरजेपोटी बांधलेली घरे होणार कायमची मुख्यमंत्र्यांसमवेत महाविकास आघाडीची चर्चा ही बातमी मोठ्या दिमाखात प्रसिद्ध झाली. त्या बातमीने हजारों प्रकल्प ग्रस्तांच्या चेहर्‍यावर 36 वर्षांनी अचानक चैतन्य बहरले.हे चैतन्य किती दिवस पुरेल आणि खरच कायमस्वरूपी टिकेल का ? असाही मोठा प्रश्‍न घेऊन माझ्यासारखे काही प्रकल्पग्रस्त चिंता करत राहिले आहेत.

आजपर्यंत कुणीही प्रकल्पग्रस्त त्यांची साडेबारा टक्के जागा कुठे आहे? हे दाखवू शकले नाही. त्या जागेचा पत्ता ना सिडकोला ना प्रकल्पग्रस्तांना. 1984 पासून 2000 सालापर्यंत पुढार्‍यांचे आवाज बंद होते. बरं वाटलं, काही दिवस महाविकास आघाडीच्या सिडकोसोबत बैठका होत आहेत. त्यामध्ये काही मुद्दे उत्पन्न झाले ही असतील पण ते काही मुद्दे ना लोकांपर्यंत पोहोचविले. परंतू मागील 8/10 दिवसात मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकांमध्ये साडेबारा टक्के जमीन आणि गरजेपोटी बांधलेली घरे कायम होणार या दोन्ही गोष्टी मोठ्या पोस्टरबाजीतून प्रकल्पग्रस्तांपर्यंत पोहोचल्याने तो नक्कीच सुखावला आहे.

यावेळी आघाडीकडून गरजेपोटी बांधलेली घरे कायमची होणार हे जरी पसरविण्यात आले असले तरी लवकर म्हणजे कधी? हा प्रश्‍न उरतोच. पुढार्‍यांवर काहीसा विश्‍वास ठेवून दोन महिन्यांत हा प्रश्‍न निकाली काढतील ही अपेक्षा, अन्यथा ये रे माझ्या मागल्या असेच म्हणावे लागेल.

Exit mobile version