| वाघ्रण | वार्ताहर |
व्यक्तिगत टीका केलीत तर खपवून घेणार नाही, अशा शब्दात शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला. पेझारी येथील शेकापच्या मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी (दि. 4) अलिबाग-मुरुड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी 90 टक्के यश आपल्याला मिळाले आहे. मी नेहमीप्रमाणेच गोरगरीबांसाठी काम करणार असून, रोजगार उपलब्ध करण्यासाठी, विविध उपक्रम राबविणार आहे. आपल्यासाठी मी कायम शेतकरी भवनात असेन, असे आश्वासनही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. शेकाप जिल्हा आढावा बैठकांबाबत संवाद साधताना वेळापत्रकानुसार त्या-त्या तालुक्यात विभागात होणार्या कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहावे, असे आवाहनदेखील केले.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. या आढावा बैठकीत शेकाप महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी बोलताना शेकाप कार्यकर्ता केवळ पदासाठी काम करीत नसतो, तो निष्ठा म्हणून काम करीत असतो, असे मत व्यक्त केले. तसेच झालेल्या पराभवाचा आढावा घेत, यापुढे काय दिशा असावी, याबाबत संवाद साधला.
या आढावा बैठकीला शेकापचे ज्येष्ठ नेते कबनअण्णा नाईक, तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी पं.स. उपसभापती अनिल गोमा पाटील, किशोर हजारे, विजय गिदी, तुकाराम पाटील, प्रदीप नाईक, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दि. 8 ते 11 फेब्रुवारीदरम्यान होणार्या या जिल्हा दौरा आढावा बैठकीला त्या-त्या विभागातील आजी-माजी सरपंच, उपसरपंचांसह शेकाप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. या आढावा बैठकीचे पत्रकार प्रकाश म्हात्रे, मो.रा. पाटील यांनी स्वागत, सूत्रसंचालन करीत शेवटी आभार मानले.