अद्याप गृहविभागाची मान्यता नाही
| मुंबई | प्रतिनिधी |
गृह विभागाने 20 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून 15 हजार 631 पोलिस शिपायांची भरती करण्याचे जाहीर केले. शासन निर्णय निघून दोन महिने उलटले, तरी अद्याप अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. गृह विभागाकडून भरतीस अंतिम मान्यताच मिळाली नसल्याची बाब आता पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस भरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे.
राज्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत. शहर-जिल्ह्यांचा विस्तार व लोकसंख्येतील वाढ आणि गुन्ह्यांची वाढलेली संख्या, या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरेच आहे. त्यामुळे पोलीस दलातील रिक्त होणारी 100 टक्के पदे वेळोवेळी भरली जातात. गणेशोत्सवानंतर पोलीस भरतीस प्रारंभ होईल, असे प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. ऑगस्टमध्ये पोलीस भरतीचा शासन निर्णय निघाल्याने तरुण-तरुणींना मोठा आनंद झाला होता. मात्र, ऑक्टोबर संपतोय तरीदेखील पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झालेली नाही. गृह विभागाच्या अंतिम मान्यतेनंतर भरतीची प्रक्रिया पुढे सुरू होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. त्यानंतर दोन ते तीन टप्प्यात जानेवारीपर्यंत या निवडणुका चालणार आहेत. त्यामुळे पोलीस भरती आचारसंहिता संपल्यावर ऐन उन्हाळ्यात सुरू होईल की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
अशी आहेत भरतीची पदे
पोलीस शिपाई : 12,399
चालक : 234
बॅण्डसमन : 25
सशस्त्र पोलीस शिपाई : 2,393
कारागृह शिपाई : 580
एकूण : 15,631
