| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकने पुन्हा शस्त्रसंधी धुडकावून लावल्यानंतर भारताने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर थांबणार नसून ते सुरुच असल्याचेही यावेळी पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.
पंतप्रधान मोदी बैठकीत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. जर त्यांनी गोळीबार केला, तर आपणही गोळीनेच उत्तर द्यायचं. त्यांनी हल्ला केला, तर आपणही हल्ल्यानेच उत्तर द्यायचं. वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा. त्यांच्या हवाई तळांवरील हल्ले, हा या ऑपरेशनमधील निर्णायक क्षण होता, असे ते म्हणाले. हा भारताने दिलेला महत्त्वाचा मेसेज होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी बैठकीत म्हणाले की, बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरील सर्वात घातक हल्ला होता. सगळ्यात शक्तिशाली अस्त्र त्यासाठी वापरलं गेलं. जैश ए मोहम्मदची निर्मिती आयएसआयने केलेली आहे आणि भारताने त्यांना हा महत्त्वाचा मेसेज दिला.
बहावलपूर, मुरिदके आणि मुजफ्फराबादमधील अड्डे मातीत गाडले. सिंधू जल कराराचा संबंध सीमेपलीकडून होणार्या दहशतवादी कारवायांशी आहे. जोपर्यंत सीमेपलिकडून होणार्या दहशतवादी कारवाया थांबत नाही, तोपर्यंत हा स्थगित राहील. तिसरी गोष्ट म्हणजे घुस के मारेंगे. भारताने पाकिस्तान आतमध्ये शिरून त्यांच्या ह्रदयावरच हल्ला केला. ही मोहीम खूप यशस्वी ठरली आहे, असेही मोदी बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष अधिवेशन बोलवा
भारत-पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाली आहे. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन आणि पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिकेची भूमिका यावर चर्चा करावी, असे आवाहन केले आहे.
20 ठिकाणी छापेमारी
दक्षिण काश्मीरमधील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये राज्य तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात आली आहे, वीस ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीमध्ये स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे, संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, ते विविध दहशतवादी संघटनांच्या थेट संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य तपास यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.