खेलो इंडिया युवा खेळ अंतर्गत क्रीडा स्पर्धेत गावाचे नाव उज्ज्वल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
खेलो इंडिया युवा खेळ अंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेत श्रमिका पाटील हीने रुपेरी यश मिळविले. रविवारी तिचे महाजने गावात आगमन होताच, ग्रामस्थांकडून तिचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. महाजने ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळाच्या वतीने तिच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
खेलो इंडिया अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नुकत्यात गया (बिहार) येथे पार पडली. गतका मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात श्रमिका श्रीधर पाटील हिने उत्तम कामगिरी बजावर रुपेरी यश संपादन केले. श्रमिका पाटील हिचे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास महाजने गावात आगमन झाले. तिचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले. फुलांचा हार घालून तिची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील महाजनाई व महामारी देवीचे दर्शन तिने घेतले. त्यानंतर महाजने ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच मुंबई मंडळाच्यावतीने तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक संतोष कवळे, श्रमिका पाटीलचे वडील श्रीधर पाटील, आई श्रध्दा पाटील, महाजने ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग, मुंबईमध्ये नोकरी व्यवसाया निमित्त राहणारे ग्रामस्थ उपस्थित होते. खेलो इंडिया युवा खेळ ही भारत सरकारद्वारे आयोजित केली जाणारी एक राष्ट्रीय स्तरावरील बहू क्रीडा स्पर्धा आहे. शाळेसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील खेळाबाबतची प्रतिभा ओळखळे, त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपिठ मिळवून देण्याबरोबरच क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. सातवी खेलो इंडिया युवा खेळ अंतर्गत बिहारमधील गया येथे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्रमिका पाटील हिने सहभाग घेतला होता. गतका मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात तिने उत्तम कामगिरी करीत रौप्य पदक मिळविले. खेलो इंडिया युवा खेळ अंतर्गत होणार्या क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणारी श्रमिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली खेळाडू असल्याचे बोलले जात आहे. तिच्या या कामगिरीबाबत ग्रामस्थ मंडळाकडून विशेष सन्मान करण्यात आले. सोशल मिडीयासह वेगवेगळ्या क्षेत्राकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
खेलो इंडिया युवा खेळ अंतर्गत गतका मार्शल आर्ट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. प्रशिक्षक संतोष कवळे यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन, आई, वडिलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आज इतपर्यंत पोहचण्याची संधी मिळाली आहे. आपल्या देशासाठी, राज्यासाठी, जिल्हा व तालुका तसेच महाजने गावासाठी सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न आहे. त्याची तयारी करून सुवर्णपदक मिळवून देईन, असा विश्वास आहे.
श्रमिका पाटील
गतका मार्शल आर्ट खेळाडू