अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या घटनेने खळबळ
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ताडगाव येथील एका विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय रविवारी सकाळी निर्माण झाला होता. या घटनेने परिसरात काही काळ तणाव व संतापाचे वातावरण झाले होते. मात्र, मुलीचे प्रेम तोडण्यासाठी त्या व्यक्तीने बुवाबाजीचा आधार घेतल्याची माहिती तपासाअंती समोर आली. अंधश्रद्धेला खातपाणी घालणार्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
अखलाक आयुब खान असे या व्यक्तीचे नाव आहे. तो नवी मुंबईतील धारवे येथील रहिवासी आहे. रविवारी सकाळी ताडगाव विहिरीजवळ तो उभा होता. त्याने त्याच्या पिशवीतून काहीतरी काढले. त्यानंतर विहिरीत टाकल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. स्थानिकांनी जवळ जाऊन त्याला विचारणा केली, त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्याने विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय निर्माण झाला. ही माहिती वार्यासारखी पसरताच अनेकांनी जमाव केला. काही काळा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी खान याला विहिरीतील पाणी पिण्यास सांगितले. त्याने पाणी पिण्यास नकार दिल्याने ग्रामस्थांचा संशय अधिक बळावला. अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची विचारपूस केल्यावर मुरूड तालुक्यातील मजगाव येथील तो जावई आहे. चोरडे येथे तो रविवारी लग्न समारंभाला आला होता.
खान याच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेम असल्याची माहिती त्याला मिळाली. ती त्याच्या सोबत लग्न करण्याच्या तयारीत असल्याचेही त्याला समजले. त्यामुळे त्यानेे मुलीचे प्रेम तोडण्यासाठी एका बुवाचा आधार घेतला. त्याला मुलीची सर्व माहिती सांगितली. बुवाने त्या इसमाकडे कागदी पुडीत जडीबुटी दिली. जडीबुडी आणि विट 24 विहिरीमध्ये टाकण्यास सांगितले. त्यामुळे त्याने चोरडे येथे जात असताना साळाव ते ताडगावपर्यंतच्या चार विहिरीमध्ये जडीबुटी आणि विट टाकली. त्यानंतर पाचव्या विहिरीत साधनसामुग्री टाकत असताना स्थानिकांनी त्याला रोखले.
पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत
विहिरीत विष टाकल्याचा संशय निर्माण झाला होता. त्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेत हे प्रकरण शांत केले. ज्या विहिरीत साधनसामुग्री टाकली होती. त्या विहिरीतील पाणी पोलीस प्यायले. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीलादेखील पिण्यासाठी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
भोंदूबाबावर आजही भरवसा
अनेक नागरिक विविध आजारांवर उपचारासाठी रुग्णालयात जाण्याऐवजी भोंदूबाबाकडे जातात. आजही नागरिकांचा रुग्णालयापेक्षा भोंदूबाबावर अधिक भरवसा असल्याचे दिसते. हा प्रकार ग्रामीण भागात जास्त दिसतो.
जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
जादूटोणाविरोधी कायदा लागू असला, तरी अंधश्रद्धेचा बाजार कायम असून, जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असता, त्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे यासंदर्भात बर्यापैकी जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, शासनस्तरावरही ग्रामीण भागत जनजागृती गरजेची आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
जिल्हह्यात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत तीनशेहून अधिक घटना उघडकीस आणल्या आहेत. मात्र, अंद्धश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. अनेकजण यात लुबाडले गेले आहेत. मात्र, त्याबाबत कोणीच पुढे येत नाही, त्यामुळे गुन्हे दाखल होत नाहीत.
25 विहिरीत जडीबुटी टाकण्याचा सल्ला
मुलीचे प्रेम तोडायचे असेल, तर जडीबुटी आणि एक वीट 25 विहिरीत टाकाव्या लागतील, असा अघोरी सल्ला बाबाने दिला होता. बाबाच्या सल्ल्याने खान नामक इसम साळावपासून ताडगावपर्यंत जडीबुटीची पुडी आणि एक वीट टाकत आला. चार विहिरीत अशा प्रकारे कार्यक्रम केल्यानंतर पाचव्या विहिरीत पुडी टाकत असताना त्याला ग्रामस्थांनी पाहिले आणि बिंग फुटले. त्यामुळे हा अघोरी प्रकार समोर आला.
जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. पोलिसांनी बुवाचा आधी तपास करायला हवा. जर आम्हाला पोलिसांनी बुवाचे नाव दिले, तर त्याला सर्वांसमोर आणू. त्या ठिकाणी जाऊन समाजाचे प्रबोधन करु. बुवाबाजीच्या नादी लागून कुटुंबंच्या कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आधुनिकतेच्या युगात बुवाबाजीला बळी पडू नको. त्यांच्या नादी लागू नका. जर कोणी असे प्रकार करीत असेल, त्याची माहिती आम्हाला द्या, त्याची दृष्यकृत्ये समाजासमोर आम्ही नक्कीच आणू.
नितीनकुमार राऊत,
अंनिस, राज्य अधिकारी