मच्छिमारांच्या हक्कासाठी रणशिंग फुंकणार: हर्षवर्धन सकपाळ

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जीवन उद्ध्वस्त झालेल्या मच्छिमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष आक्रमक पवित्रा घेणार आहे, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी व्यक्त केला आहे.

विमानतळाच्या निमित्ताने पारंपरिक खाडी संपवून मच्छिमारांची उपजीविका उद्ध्वस्त करण्यात आली आहे. हातातली मासेमारीची दोरी सुटल्याने मच्छिमार बांधव उपासमारीच्या खाईत लोटले गेले आहेत. मासेमारी हा एकमेव व्यवसाय असलेल्या या बांधवांना न्यायासाठी सरकारदरबारी भटकावे लागत आहे.
अटळ सेतू प्रकल्पबाधितांना जशी नुकसान भरपाई मिळाली, तशीच भरपाई आणि प्रकल्पग्रस्त दर्जा देण्याची मच्छिमारांची मागणी वर्षानुवर्षे धूळ खात पडून आहे. मात्र, आजवर कोणत्याही पक्षाच्या नेत्याने या जीवघेण्या प्रश्‍नाकडे ढुंकूनही पाहिले नाही.

मच्छिमारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेस फिशरमन सेलचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा यांच्या पुढाकाराने, सकपाळ यांच्या उपस्थितीत नुकताच मेळावा पार पडला. या मेळाव्यात मच्छिमारांचे दुःख ऐकून सकपाळ संतप्त झाले आणि स्पष्ट शब्दात सांगितले “मच्छिमारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही! गरज पडली तर रस्त्यावर उतरून सरकारला धारेवर धरू!’’ सकपाळ यांनी हा लढा उचलून धरल्याने आता रायगड जिल्हा काँग्रेसची भूमिका काय राहते, याकडे मच्छिमार बांधवांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version