| अलिबाग | प्रतिनिधी |
आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमाविल याबाबत रायगड मतदार संघातील मतदारांना उत्सुकता लागली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीचा कानोसा घेतल्यास महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. फक्त नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. विद्यमान खा. सुनील तटकरे हे पुन्हा राजकीय भवितव्य अजमाविणार की पुन्हा विधानसभेकडे वळणार याबाबतही कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे.
2019 ची लोकसभा आणि आता 2024 ची लोकसभा निवडणूक यामध्ये कमालाची फरक पडला आहे. 2019 मध्ये तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यांना शेकाप, काँग्रेसने पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर राज्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार, त्या सरकारची अडीच वर्षे. त्यानंतर शिवसेनेत फूट पडून सत्तेवर आलेले शिंदे, फडणवीस सरकार आणि त्या सरकारात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दिलेला पाठिंबा यामुळे जिल्ह्याचे राजकीय चित्रच पूर्णपणे बदलले आहे. अशा बदलत्या परिस्थितीत कोणत्या पक्षाचा उमेदवार लोकसभेसाठी उभा राहणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. कारण रायगडवर आता भाजपचाही डोळा आहे. तर विद्यमान खासदार म्हणून तटकरे हे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे नेमक कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे.